हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी महिलेच्या ‘ब्लॅकमेल’मधून डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या!

admin 3 Min Read
3 Min Read

– मनीषा मुसळे-मानेच्या विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून अटक
– खोटारटे आरोप करून ब्लॅकमेल केल्यानेच डॉ. वळसंगकर यांनी संपविले जीवन?

सोलापूर (हेमंत चौधरी) – शहरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी वळसंगकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे – माने हिला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली असून, तिची कसून चौकशी सुरू आहे. मनिषा माने हिने ब्लॅकमेल केल्याने व खोटारडे आरोप केल्याने तणावाखाली गेलेल्या डॉ. वळसंगकर यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांचा मुलगा डॉ. अश्विन शिरीष वळसंगकर (वय ४५ वर्ष, रा. एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस, वळसंगकर हॉस्पिटल, मोदी रेल्वे क्रॉसिंग, सोलापूर) यांच्या तक्रारीवरून संबंधित महिलेविरोधात रात्रीच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

आत्महत्येपूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, यामध्ये मनिषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १० च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात डॉ.अश्विन शिरीष वळसंगकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनिषा माने हिने वेळोवेळी सहकार्य करूनदेखील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्यावर खोटे आरोप करून धमकी वजापत्र पाठवल्याने फिर्यादीच्या वडिलांनी त्या महिलेच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी स्वतःच्या बेडरूममधील अटॅच असलेल्या बाथरूममध्ये स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्टलमधून कानशीलमध्ये गोळी झाडून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
डॉक्टर शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन होते. हजारो लोकांच्या मेंदूवरती शस्त्रक्रिया करणारे वळसंकर यांनी स्वतःच्या मेंदूत गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये मनिषा माने या महिलेवरती आरोप केलेले आहेत. त्या महिलेला आपण आयुष्यात उभे केले, हॉस्पिटलची प्रशासकीय सूत्रे हातात दिली. त्याच महिलेने आपल्यावरती घाणेरडे आरोप केले. हे सहन होत नसल्यामुळे आपण आपले जीवन संपवत असल्याचे डॉक्टर शिरीष वळसंगकरांनी चिठ्ठीत उल्लेख केलेला होता. काल ही सुसाईड नोट पोलिसांना घटनास्थळावरून मिळाली आहे. पोलिसांनी या चिठ्ठीच्या आधारे मनीषा मुसळे-माने हिला तिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे त्याचबरोबर रात्री महिलांना अटक करता येत नाही, त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाची विशेष परवानगी घेतल्यानंतर रात्री ११ वाजता या महिलेला अटक केली. आज पोलिस रिमांडसाठी या महिलेला दुपारपर्यंत कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


डॉ. वळसंगकरांना रूग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्रांवरती हवे होते. त्यासाठी त्यांचा आग्रहदेखील होता, पण आजकाल रूग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती. यासंदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. पण त्यांचे कोणी ऐकत नव्हते. जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती, तिला डॉ. वळसंगकरांनी कामावरूनदेखील काढले होते. पण नंतर या महिला कर्मचार्‍याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती. तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, डॉक्टरांना ते मान्य नव्हते. या प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली होते. तसेच, अनेक घाणेरडे आरोपदेखील या महिला अधिकार्‍याने डॉ. वळसंगकर यांच्यावर केले होते, असे सूत्राने सांगितले.
्————-

Share This Article
Exit mobile version