फत्तेकिरबाबा व येडेबाबा संस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून भरीव मदत करणार; आ.मनोज कायदे यांची ग्वाही!

admin 2 Min Read
2 Min Read

– निमगाव वायाळ येथील अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमदभागवत कथा सोहळ्याला लावली उपस्थिती

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – निमगाव वायाळ (ता. सिंदखेडराजा) येथील श्रद्धास्थान असलेल्या फत्तेकिरबाबा व येडेबाबा संस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच संस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव आर्थिक मदत करण्याचा ठाम निर्धार सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे यांनी व्यक्त केला आहे. आज, दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी निमगाव वायाळ येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमदभागवत कथा सोहळ्याच्या निमित्ताने आमदार कायदे यांनी भेट दिली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी संस्थानाचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा लक्षात घेता, फत्तेकिरबाबा व येडेबाबा संस्थानाची स्वतंत्र ओळख राज्यस्तरावर निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. लवकरच संस्थानाच्या विकास आराखड्यासाठी आवश्यक निधी मंजूर केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

या प्रसंगी सरपंच गजानन काकड, शुभम कायदे व सहकारी यांची उपस्थिती होती. आमदार मनोज कायदे यांच्या आगमनानंतर संस्थान व ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचे औक्षण व स्वागत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी संस्थानकडे जाणार्‍या रस्त्याची मागणी केली असता, लवकरच रस्ता मंजूर करून काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आमदार कायदे यांनी दिले. ‘मी तुमचाच आमदार आहे. फक्त संस्थानच नव्हे तर संपूर्ण गावाचा विकास माझे ध्येय आहे,’ असेही त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. फत्तेकिरबाबा व येडेबाबा संस्थानाच्या माध्यमातून भाविकांची श्रद्धा आणि भावना लक्षात घेता, या पवित्र स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देऊन भव्य विकासकामे राबवली जातील, अशी ग्वाही आमदार कायदे यांनी दिली. कार्यक्रमाला संस्थानचे आयोजक, ग्रामपंचायत सरपंचपती रामेश्वर चाटे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रामभाऊ हुसे, माजी तंटामुक्त अध्यक्ष श्रीराम वायाळ, आदर्श शिक्षक मुरलीधर वायाळ, मानवी प्रोसेसिंगचे संचालक सिद्धेश्वर वायाळ, विनोद वायाळ, मयुर वायाळ, अमोल हुसे, जेष्ठ समाजसेवक डिगांबर हुसे, तसेच हिवरखेड पूर्णा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version