शब्द देऊन कर्जमाफी होत नसेल तर आसूड हातात घ्यावा लागेल – खा. डॉ. अमोल कोल्हे

admin 4 Min Read
4 Min Read

– मेहकर येथे महापुरूषांच्या संयुक्त जयंती समारंभात डॉ. कोल्हे यांचे घणाघाती भाषण
– गरिबांची घरं मोडून विकास होत नसतो; अतिक्रमण हटाव मोहिमेवरून सत्ताधार्‍यांना टोला
– गद्दारी ही आपली परंपरा नाही, आ. सिद्धार्थ खरात यांनीही शिंदे गटाला फटकारले!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – केंद्र सरकारने बळीराजासाठी अंदाजे आठ लाख कोटी खर्च केले, मात्र एका वर्षात उद्योगपतींचे १७ लाख कोटी रूपयांचे कर्ज माफ केले. तेव्हा हा देश कोणाचा? हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफीचा शब्द दिला आणि त्यांच्याकडून सत्ता मिळवली. पण, आता त्यांनी शब्द फिरवला आहे. तेव्हा, शेतकर्‍यांना हातात आसूड घेण्याची वेळ आली आहे, असे जोरदार टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी डागले. मेहकर येथे स्वातंत्र्य मैदानावर ज्योती-सावित्री सेवा संघाच्यावतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

आपल्या घणाघाती भाषणात खा. डॉ. कोल्हे म्हणाले, की ज्यावेळी विचार मांडायचे असतात तेव्हा गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचे असतात. या मातीने महाराष्ट्राला, बुलढाणा जिल्ह्याला नैतिक अधिष्ठान दिले आहे. तब्बल साडेतीनशे वर्षानंतर ज्यांचे नाव आजही सर्वत्र मोठ्या अभिमानाने घेतले जाते ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राष्ट्रमाता जिजाऊंचा हा जिल्हा आहे. आजचा कार्यक्रम महिलांनी आयोजित केला, याचा आनंद वाटला. मी यासाठी आलो की आपल्या माता भगिनींना जिजामातेचे मातृत्व, सावित्रीबाईचं कर्तृत्व व अहिल्याबाई होळकरांचे नेतृत्व, असा वारसा लाभलेला आहे. सदसद विवेकबुद्धीला मूठमाती देणार्‍या बेधुंद तरूणांची संख्या सध्या वाढत आहे. कर्जमाफीवर सरकार बदलते तेव्हा शेतकर्‍यांचा आसूड हातात घेण्याची वेळ आली आहे. शेतकर्‍यांना शब्द द्यायचा असेल तर १०० वेळा विचार करा. आपल्याला महापुरुषांच्या जयंत्या डीजेवर नाही तर वैचारिक विचारांवर साजर्‍या करायच्या आहेत. एकेकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणायचे की, घरे मोडून विकास होत नाही ते विचार आज कुठे गेले? हा मेहकरच्या अतिक्रमण हटाव मोहिमेसंदर्भात खासदार कोल्हे यांनी सत्ताधार्‍यांना टोला लगावला. नोटाबंदी नंतर दहा लाखापेक्षा जास्त मध्यम धंदे बंद झाले. मात्र उद्योगपतींची चांदी होत आहे. केंद्र सरकारने बळीराजासाठी अंदाजे आठ लाख कोटी खर्च केले मात्र एका वर्षात उद्योगपतींचे १७ लाख कोटी कर्ज माफ केले. तेव्हा देश कोणाचा, हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. डीजे लावून जयंती साजरी करायची की आसूड काढून साजरी करणार हे ठरवण्याची आता वेळ आली आहे. सणाला उत्सवाचे रूप देणार्‍यांची गुलामी केली तर परिस्थिती बदलणार नाही, असा घणाघातही खा. कोल्हे यांनी केला. सध्या विरोधकांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न सुरू असून एकाधिकारशाही निर्माण करायची आहे. तेव्हा महापुरूषांचे विचार आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली असून, असे झाले तरच देश महासत्ता होईल, असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे शेवटी बोलले.
यावेळी मेहकरचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात आपल्या भाषणात म्हणाले की, मेहकरला चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मेहकरचा आमदार म्हणून यापुढेही माझे अशा कार्यक्रमांना सहकार्य राहील. आपली महाराष्ट्राची परंपरा थोर आहे. गद्दारी ही आपली परंपरा नाही. गद्दारांच्याविरुद्ध महाराष्ट्र आहे. समता, स्वातंत्र्य, न्यायाची परंपरा आपली आहे. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर यांचीसुद्धा भाषणे झाली. कार्यक्रमाच्या आयोजक रंजना प्रकाश सौभागे व जया अरुण बळी तसेच आरती दीक्षित यांनी प्रमुख वक्ते डॉ. अमोल कोल्हे व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी कार्यक्रम मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य भास्करराव काळे, माजी सभापती भास्करराव गारोळे, राजश्री प्रतापराव जाधव, रंजना संजय रायमुलकर, माजी नगरसेविका डॉ.दीपिका रवी रहाटे, उपजिल्हाप्रमुख आशीष रहाटे, शहर प्रमुख किशोर गारोळे, काँग्रेसचे अनंत वानखेडे, युवा सेनेचे आकाश घोडे, सिंदखेडराजा येथील शिवाजीराव जाधवसह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजिका रंजना प्रकाश सौभागे यांनी, सूत्रसंचलन ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार तर आभार आयोजिका जया अरुण बळी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share This Article
Exit mobile version