विरोधकांकडून अतोनात छळ; रोहणा सरपंचपतींची गळफास घेऊन आत्महत्या

admin 3 Min Read
3 Min Read

– रोहणातील माजी सरपंचपतीसह दोघांविरोधात खामगाव पोलिसांत गुन्हे दाखल
– आरोपींना अटकेसाठी नातेवाईक, ग्रामस्थ आक्रमक; गावात तणाव!

खामगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील रोहणा येथील सरपंचपती संतोष गव्हाळे यांनी गावातील राजकारण व विरोधकांच्या अतोनात त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा गव्हाळे यांचे भाऊ गोपाल रामदास गव्हाळे यांच्या तक्रारीवरून रात्री खामगाव पोलिसांनी माजी सरपंचपती तुकाराम चंद्रभान डांगे व अविनाश नारायण महाले या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींवर कारवाईसाठी नातेवाईक व ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने गावात तणावदेखील निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर तणाव निवाळला होता.

खामगाव पोलिसांत गोपाल रामदास गव्हाळे (वय ४२) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद आहे, की सरपंचपती संतोष रामदास गव्हाळे (वय ४४) रा. रोहणा, ता. खामगाव यांना गावातील आरोपी तुकाराम चंद्रभान डांगे व अविनाश नारायण महाले यांनी खोट्या तक्रारी करून, शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला. तसेच, विनाकारण शिवीगाळ करून ते वारंवार धमक्या देत होते. त्यांच्या या अतोनात त्रासाला कंटाळून संतोष गव्हाळे यांनी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या तक्रारीवरून रात्री खामगाव पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. व पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने गावात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. शवपरीक्षणालाही त्यामुळेच विलंब झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मात्र शवपरीक्षण पार पडले असून, मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दुपारून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होत नाही व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घेतली होती. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. खामगाव पोलिसांनी मध्यस्थी करून आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आल्यानंतर तणाव निवळला होता. या दुर्देवी घटनेने गावात एकच हळहळ व्यक्त होत असून, मस्साजोग सरपंचांच्या हत्येप्रमाणेच ही घटना असल्याने गावात आरोपींबद्दल तीव्र संतापदेखील व्यक्त होत आहे.


मागील ग्रामपंचायत निवडणुकीत सविताताई संतोष गव्हाळे व पार्वताबाई तुकाराम डांगे यांच्यात सरपंचपदासाठी सरळ सरळ लढत झाली होती. या निवडणुकीत सविताताई गव्हाळे यांनी पार्वताबाई डांगे यांना पराभूत केले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. या रागातून आरोपींनी सरपंच सविताताई गव्हाळे व संतोष गव्हाळे यांच्या विरोधात पंचायत समिती, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त स्तरावर विविध तक्रारीही दाखल केल्या होत्या. तसेच, दोघेही आरोपी घरासमोर येऊन शिवीगाळ करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, पैसे खाल्ल्याचे आरोप करणे, तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा धमक्या देत होते. या त्रासाला कंटाळूनच संतोष गव्हाळे या माझ्या भावाने रोहणा शिवारातील निमकवळा रोडवरील शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्मत्या केली असल्याची गंभीर बाबही फिर्यादीत गोपाळ गव्हाळे यांनी नमूद केलेली आहे.

Share This Article
Exit mobile version