मेहकरची वाटचाल अतिक्रमणमुक्तीकडे; पण व्यवसायिकांचे काय?

admin 4 Min Read
4 Min Read

– जानेफळ रस्त्यावर चालला कापरेंचा बुलडोजर!
– नगरपालिका मुख्याधिकारी यांनी सांगितले नियमानुसार अतिक्रमण निघणार!

मेहकर (समाधान म्हस्के) – मागील काही दिवसांपासून मेहकर शहरात अतिक्रमण काढण्याकचे सत्र सुरु असून, काल ९ एप्रिल रोजी एकीकडे अतिक्रमणग्रस्त व नाराज व्यवसायिकानी नगरपालिकेत आपला मोर्चा नेला, ज्या ठिकाणी मुख्य अधिकारी राम कापरे यांना निवेदन देण्यात आले. ज्यात व्यवसायिकांच्या व्यथा मांडल्या गेल्या मात्र नगर पालिका मुख्याधिकारी यांनी अतिक्रमणमुक्ती करूनच सोडणार, असा पवित्रा घेत पोलिस स्वरक्षण मिळालेले नसतांनाही अतिक्रमण हटाओ मोहीम सुरू केली. शहर अतिक्रमणमुक्त होत असले तरी व्यावसायिकांचे काय, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.

मेहकर नगरपालिकेची दरवर्षी अतिक्रमण हटाओ मोहीम असते. मात्र थोडे फार अतिक्रमण काढल्यानंतर ही कार्यवाही थांबते. मात्र या वर्षी एक तर नगरपालिकेवर अधिकारीराज असल्यामुळे सध्या ही कार्यवाही जोरदारपणे सुरु आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत मागण्यात आलेली होती, मात्र सध्या यात्रा, महोत्सव, सण-वार असल्यामुळे पोलिस बंदोबस्त मिळालेला नसतांनाही मेहकरमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. एकाच वेळेत मेहकर-डोणगाव रस्ता व जानेफळ रस्ता अश्या दोन्ही बाजूने अतिक्रमण काढणे सुरु आहे. ज्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळच्या अख्त्यारित असलेल्या रस्त्यासह ४८ मीटर रस्त्याच्या कडेला असलेले ले आउट ज्यात एनए ऑर्डरप्रमाणे कुठे ९ मीटर तर कोठे १२ मीटर सर्व्हिस रस्ता घेणे सुरु आहे, तेथीलही अतिक्रमण काढले जात आहे. मेहकरमधील मुख्य व्यवसाय हे मेहकर-डोणगाव रस्ता व मेहकर-जानेफळ रस्ता या रस्त्यावर जास्तीत जास्त दुकाने असून, या व्यवसायिकांना त्याचा फटका बसत असल्यामुळे ९ एप्रिलच्या सकाळी व्यवसायिकानी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चाने नगरपालिका गाठून अतिक्रमण काढा, पण व्यावसायिकांचे हितपण जोपासा, त्यांचे पोट हे व्यवसायावर आहे, असे आपले म्हणणे मांडले. त्या अनुषंगाने निवेदनसुद्धा दिले. मात्र ११ वाजेपासून कापरे साहेबांचा बुलडोजर चालायला सुरवात झाली. सदर कारवाईमध्ये तहसीलदार नीलेश मडके, मंडळाधिकारी पंजाबराव मेटांगळे, तलाठी ठाकरे, एमएसआरडीसीचे कर्मचारी, महा वितरण कर्मचारी, नगरपालिका मुख्य अधिकारी रामराजे कापरे, किशोर ढेपले नगरअभियंता, संजय गिरी आरोग्य निरीक्षक, संतोष राणे, विशाल शिरपूरकर, शेख जाफर, अनिल मुळे, सोहेल गवळी, गणेश पाटील आदी सर्व कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.
अतिक्रमण काढण्यासाठी पूर्वी जी मार्किंग करण्यात आली, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या शाळेचा गेट, स्वरक्षण भिंत येते, त्यालासुद्धा पाडावे लागणार असून, त्याची मार्किंगसुद्धा करण्यात आली. तर कासम गवळी माजी नगराध्यक्ष यांच्या कॉम्प्लेक्ससमोरील गट्टू, किशोर गारोळे यांचे कॉम्प्लेक्स, शिवसेना पक्ष कार्यालय असे बरेच काही या अतिक्रमणच्या कचाट्यात येणार असल्यामुळे आता या कार्यवाहीवर अंकुश लागेल की निरंकुश अशी ही कार्यवाही सुरु राहील, की वरिष्ठांच्या दबावाखाली ही कारवाई थांबेल, अशी चर्चा मेहकर शहरात सुरू आहे. एकीकडे, व्यावसायिक कोरोनानंतर आर्थिक डबघाईस आलेले आहेत. त्यांचे व्यवसाय बुडालेले असून, आर्थिक तंगीत असणार्‍या व्यवसायिकांसमोर विनानोटीस अतिक्रमण कार्यवाही होत आहे. त्यामुळे काही व्यावसायिक हे न्यायालयात जावून न्याय मागण्याच्या पवित्र्यात आहेत.


केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या शाळेचे मुख्य प्रवेशद्वारसुद्धा तुटणार असून, पक्ष कार्यालयचे अतिक्रणित भाग तोडण्यास त्यांनी स्वतः सुरवात केली तर आमदार सिद्धार्थ खरात यांनी अतिक्रमण काढण्याच्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी यांना बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ८ एप्रिल रोजी टाकला. मात्र ९ एप्रिल रोजी कारवाई सुरूच राहिली. ज्याने अतिक्रमण निघणारंच का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

Share This Article
Exit mobile version