पोहण्याचा मोह जीवावर बेतला; चिखलीत स्विमिंग पुलमध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू!

admin 2 Min Read
2 Min Read

– वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी बुडाल्याने चिखलीत हळहळ!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – येथील सु. रा. चुनावले आयुर्वेद महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी चिखली तालुका क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावात बुडून मृत्युमुखी पडल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. हे दोन्हीही विद्यार्थी बीड व अकोला जिल्ह्यातील असून, त्यांना भराड हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.

चिखली तालुका क्रीडा संकुलाचा जलतरण तलाव आहे. या स्विमिंग टँकमध्ये कडाक्याचे उन्ह असल्याने पोहोणार्‍यांची संख्या वाढली आहे.  सु. रा. चुनावले आयुर्वेद महाविद्यालया बीएएमएसचे शिक्षण घेणारे सहा ते सात विद्यार्थी या टॅंकमध्ये पोहोण्यासाठी आले होते. त्यापैकी सुरज सुनील पानखडे ( रा. तेलारा, जिल्हा अकोला ) व विवेक अरुण वायले रा. गेवराई, जिल्हा  बीड) दोघांचेही वय 22 वर्षे हे विद्यार्थी पाण्यात बुडाले. त्यांना उपस्थितांनी बाहेर काढून तातडीने पोलिसांना कळवले. चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील हे आपल्या साथीदारांसह घटनास्थळी दाखल झाले असता, दोघांनाही बेशुद्ध समजून नजीकच्याच खामगाव रोडवरील भराड हॉस्पिटल येथे दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेने चिखली शहरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी या घटनेची माहिती कॉलेज व्यवस्थापनाला दिली होती. महाविद्यालय प्रशासनाने त्वरित इस्पितळात धाव घेऊन या दुर्घटनेची माहिती दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कळवली आहे.  पुढील तपास चिखली पोलिस करत आहेत.


तालुका क्रीडा संकुलातील या रेम्बो स्विमिंग पुलाचे कंत्राट विजय वाडेकर या कंत्राटदाराला देण्यात आले असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. परंतु, या कंत्राटदाराने या स्विमिंग टँकमध्ये पोहोण्यासाठी येणार्‍यांकरिता सुरक्षेची काळजी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी जीवरक्षक तैनात नव्हते, तसेच स्विमिंग टँकमध्ये प्रशिक्षकही तैनात नव्हता. त्यामुळे या दुर्देवी घटनेला जबाबदार धरून या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुढे आली आहे. भराड रूग्णालयातून या दोन्हीही विद्यार्थ्यांचे मृतदेह शवपरीक्षणासाठी चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले असून, मुलांचे पालकदेखील चिखलीत पोहोचले होते.

Share This Article
Exit mobile version