– भाजपची केंद्र व राज्यात सत्ता असल्याने विदर्भ राज्यनिर्मितीचा मार्ग मोकळा होणार!
– पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून आता दोन राज्यांच्या निर्मितीसाठी हालचाली – सूत्र
नागपूर/नवी दिल्ली (खास प्रतिनिधी) – केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने महाराष्ट्रात विदर्भ व उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात बुंदेलखंड या दोन राज्यांच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हालचाली सुरू केल्या असल्याची खात्रीशीर माहिती भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. ७ ते १४ एप्रिलदरम्यान भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार असून, त्यानंतर या दोन राज्यांच्या निर्मितीसाठी पाऊले उचलली जातील, असेही या सूत्राने स्पष्ट केले. छोट्या राज्यांची निर्मिती व तेथे सत्ता, ही अटलबिहारी वाजपेयी यांची थेअरी अमलात आणण्याचा प्रयत्न यापुढे भाजपकडून राबविला जाणार आहे.
दुसरीकडे, विदर्भाप्रमाणेच बुंदेलखंड राज्यानिर्मितीसाठीही भाजपने तेथील जनतेला आश्वासन दिलेले असून, १९७०, २०००, २००८ व २०१० मध्ये या राज्याच्या निर्मितीसाठी जोरदार आंदोलने झालेली आहेत. बुंदेलखंड हा भाग उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश राज्यांच्या १३ जिल्ह्यांत विस्तारलेला असून, गरिबी, बेरोजगारी या येथील मोठ्या समस्या आहेत. २०२८ ची विधानसभा व त्यानंतर २०२९ ची लोकसभा निवडणूक पाहाता, त्यापूर्वी हे राज्य निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. वीरता, लोकसंस्कृती व बुंदेली भाषा या तत्वावर हे राज्य निर्मिती करण्यासाठी भाजप लवकरच निर्णायक पुढाकार घेणार असल्याचेही खात्रीशीर सूत्राने स्पष्ट केले आहे.
स्वतंत्र विदर्भाचे नेतृत्व कोण करणार?; गडकरी की फडणवीस?
२०२९च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बुंदेलखंड व विदर्भ राज्यांची निर्मिती निश्चितपणे करेल, असे भाजपचे वरिष्ठस्तरीय सूत्र सांगत आहेत. कलम ३७० हटविणे, वक्फ बोर्ड कायदा, राम मंदीर यासारखे धाडसी निर्णय मोदी-शाह यांनी घेऊन ते यशस्वी करून दाखवले आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. स्वतंत्र विदर्भ व बुंदेलखंड या राज्याच्या निर्मितीसाठी भाजपने वारंवार जनतेला आश्वासन दिलेले आहे. या आश्वासनांची पूर्तता मोदी-शाह आता निश्चितपणे करणार आहेत. विदर्भ राज्यनिर्मितीला शिवसेना (ठाकरे) पक्षाचा विरोध आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची शकले उडाली असून, शिवसेनेचा एक मोठा गट भाजपसोबत आहे. तर विदर्भात उद्धव ठाकरे यांची शक्ती क्षीण झालेली आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीला आता फारसा कुणाचा विरोध उरलेला नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीसाठी भाजपला हा अनुकूल काळ असून, विदर्भ राज्य स्वतंत्र झाल्यानंतर त्याचे नेतृत्व कोण करणार? स्वतंत्र विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी? अशी राजकीय चर्चाही यानिमित्ताने रंगू शकते. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळी विदर्भ राज्य स्वतंत्र झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. तसेच, विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे या लढ्यातील त्यांचे योगदान पाहाता, २०२९ मध्ये फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री होतील, अशी अटकळही व्यक्त केली जात आहे.

