खामगांव (ब्रेकिंग महाराष्ट्र) : खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेले प्रशासक मंडळ बरखास्त करण्याचे पत्र आमदार आकाश फुंडकर यांनी राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर 02 जुन 2022 रोजी जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांना दिले होते. आ. फुंडकरांच्या पत्राचा आधार घेत मुख्य प्रशासक डाॅ.सदानंद धनोकार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर शुक्रवार 05 ऑगस्ट 2022 रोजी सुनावणी होवुन मा.उच्च न्यायालयाने प्रशासक मंडळाला पुढील आदेशापर्यंत संरक्षण दिले आहे. त्यामुळे ‘मुंगेरीलालचे हसीन सपने’ पाहणारे आ.आकाश फुंडकर व कंपुंचे मनसुबे धुळीस मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्य प्रशासक डाॅ.सदानंद धनोकार यांनी दिली आहे.
खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडी सरकारने अशासकीय प्रशासक मंडळाची नेमणूक केल्याने 05 मे 2022 पासून प्रशासक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर कार्यरत झाले होते व प्रशासक मंडळ स्थापन होता बरोबर बाजार समितीच्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी शासन व पणन संचालक यांच्या मान्यतेने मोठया प्रमाणात विकासकामे सुध्दा हाती घेण्यात आली होती.
मा. न्यायालयाच्या या निर्णयाबाबत बाजार समितीचे मुख्य प्रशासक डाॅ.सदानंद धनोकार यांनी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा व सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव यांना लेखी पत्र पाठवून राजकीय दबावाखाली मा.उच्च न्यायालयाचा आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पत्र दिले आहे.

