राज्यात ११० तालुक्यांमध्ये २६ ते २७ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त!

admin 3 Min Read
3 Min Read

– राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान!
– कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली माहिती; २४ जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू; लवकरच मदतीचा निर्णय!
– कांदा, द्राक्ष, गहू, पालेभाज्या, फळबागा, मका, बीजवाई, आंबा पिकांचे नुकसान; पंचनामे पूर्ण झाल्यावर आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मदत मिळणार!

मुंबई/नाशिक (प्रतीक्षा कांबळे) – राज्यातील अनेक भागात मागच्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा फटका बसला असून, पंचनाम्याचे आदेश संबंधित कृषी विभागाला देण्यात आले आहेत. २४ जिल्ह्यांतील ११० तालुक्यांमध्ये २६ ते २७ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. पुढच्या चार-पाच दिवसांत आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक घेऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली. सद्या २४ जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू असून, कांदा, द्राक्ष, गहू, पालेभाज्या, फळबागा, मका, बीजवाई, आंबा पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मदत दिली जाणार असल्याचेही कोकाटे यांनी स्पष्ट केले.

कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, की पीकविम्याचे पुनर्गठन करण्यात येत असून, सरकार लवकरच याबाबत धोरणात्मक निर्णय होईल. हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पाऊस तसेच गारपिटीचा इशारा दिला होता. शुक्रवारी (दि.४) काही भागातच पाऊस झाला तर मागच्या दोन दिवसांत मात्र ११० तालुक्यांत पावसाने कहर केला. आपत्ती व्यवस्थापन विभागाशी माझी आजच भरपाईबाबत काय करता येईल, याविषयीची चर्चा झाली असून, यात जिरायती पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती कोकाटे यांनी दिली.


  • हवामान विभागाने राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागात काही ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी वादळी वार्‍यासाह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातदेखील अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
  • गेल्या २४ तासांत अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मका, ज्वारी, कांदा, आंबा, केळी व इतर पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर, अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने गहू, बाजरी, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यातील आठ तालुक्यांना वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा बसला. साक्री तालुक्यात पश्चिम पट्ट्यातही पाऊस झाला. विदर्भात भंडारा, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, तर मराठवाड्यात वैजापूर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. विदर्भात वीज पडून शेतकऱ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. 
Share This Article
Exit mobile version