अपघातातील जखमींची जिल्हाधिकारी, शर्वरीताई तुपकरांनी केली विचारपूस!

admin 3 Min Read
3 Min Read

– जखमींना वैद्यकीय उपचार व मृतदेह कुटुंबीयांना देण्याच्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रशासनाला सूचना!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – शेगाव – खामगाव मार्गावरील तीन वाहनांच्या विचित्र अपघातातील मृतांची संख्या सहावर गेली असून, २४ प्रवासी जखमी आहेत, तर तीन जण अत्यवस्थ आहेत. या जखमींची जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी खामगाव येथील शासकीय रूग्णालयात जाऊन भेट घेतली व वैद्यकीय उपचाराची माहिती घेतली. जखमींना तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना दिलासा दिला. शेतकरी नेत्या अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर यांनीही जखमींची भेट घेऊन मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. दरम्यान, या भीषण अपघातातील मृतकांच्याप्रती दुःखसंवेदना व्यक्त करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याच्या दृष्टिकोनातून तात्काळ कारवाई करण्याची निर्देश केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांना दिल्यात. त्यानंतर, दुपारी एक वाजेपर्यंत रूग्णालयाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती.

जिल्हाधिकारी डाॅ. किरण पाटील यांनी अपघातस्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली व रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. जखमींवर वैद्यकीय उपचार हे शासकीय खर्चाने करण्यात येत आहेत.

खामगाव – शेगाव महामार्गावर बोलेरो गाडी आणि एस.टी महामंडळाची पुणे परतवाडा बसचा सकाळी ५ वाजेच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला. त्याचवेळी पाठीमागून आलेली खाजगी ट्रॅव्हल्सही या वाहनांवर जाऊन धडकली. या तिहेरी भीषण अपघातामध्ये पाच जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर एका गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील २४ जणांना खामगाव येथील शासकीय उपजिल्हा सामान्य रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. तर यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथील शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.भागवत भुसारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेत. सोबतच अपघातातील मृतकांचे शव त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द करण्याच्या सूचनाही दिल्यात. दरम्यान, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.भागवत भुसारी यांनी खामगाव येथील जिल्हा उपसामान्य रुग्णालयाला भेट दिली. दुपारी एक वाजेपर्यंत अपघातातील शव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जखमींवर जिल्हा उप सामान्य रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. या शिवाय, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनीही खामगाव येथील उपजिल्हा रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. वैद्यकीय मदतीची माहिती घेऊन उपचाराबाबत वैद्यकीय यंत्रणेला सूचना दिल्यात.

शेगाव-खामगाव महामार्गावर भीषण अपघात; 6 ठार, 24 जखमी

Share This Article
Exit mobile version