– भाजपा युती सरकारकडून शेतकरी व लाडक्या बहिणींची घोर फसवणूक, मते घेऊन सत्तेत आले आणि विसरले!
– भाजपाचा सत्तेच्या विकेंद्रीकरणाकडून केंद्रीकरणाकडे उलटा प्रवास; सत्तेच्या हव्यासामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, असा संताप व्यक्त करत, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
काँग्रेस सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण केले पण मोदी सरकारचे धोरण मात्र सत्ता केंद्रीत करण्याचे आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशाचे प्रतिनिधित्व केवळ काही आमदार, खासदार करणे कठीण आहे म्हणून नगरसेवक, सरपंच, सभापती, महापौर असे सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते पण भाजपाला विशेषतः नरेंद्र मोदींना केंद्रात तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांना सत्ता त्यांच्या हातात हवी आहे आणि हट्टामुळेच तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासनराज सुरु असून सामान्य माणसांच्या अधिकारांवर गदा आली आहे असेही काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले.
काँग्रेस कार्यकर्ता मेळावा..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल उल्हास नगर, कल्याण डोंबिवलीला भेट देऊन स्थानिक पदाधिकार्यांशी संवाद साधला. तसेच कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिब हटावची योजना राबवली, बांग्लादेशाची निर्मिती केली,बँकांचे राष्ट्रीयीकरण केले तर राजीव गांधी यांनी पंचायत राज आणले, संगणक क्रांती आणली. डॉ. मनमोहनसिंह सरकारने सर्वसामान्यांच्या हातात पैसा कसा येईल यासाठी धोरणे आखली. प्रत्येक पंतप्रधानांनी काहीही ना काही योगदान दिले आहे पण आत्ताच्या पंतप्रधानांची ओळख खोटे बोलणारा, भांडणे लावणार अशी आहे. मोदींचा कारभार म्हणजे ‘हम दो, हमारे दो’ असा आहे. आता आपल्याला लढायचे आहे आणि ही लढाई जीवन मरणाची आहे, ‘करो या मरो’ची आहे, त्यामुळे लढायची तयारी ठेवा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील, उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

