लिंगा येथे तीव्र पाणीटंचाई, पिण्यासाठी पाणी द्या; ग्रामस्थांचा टाहो!

admin 1 Min Read
1 Min Read

– पाणी न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथून जवळच असलेल्या लिंगा काटेपांग्री ही गट ग्रामपंचायत असून, लिंगा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. किमान पिण्यासाठी तरी पाणी द्या, अशी मागणी मागासवर्गीय नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. आमच्या मागणीची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लिंगा काटेपांग्री ही गट ग्रामपंचायत असून, लिंगा गावात मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाज राहतो. या गावांसाठी जल जीवन योजनेच्या माध्यमातून नळयोजना मंजूर करण्यात आली आहे. परंतु, या गावात आजपर्यंत योजनेचे पाणी आले नाही. गेली पाच वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या अगोदर २५ फेब्रुवारीरोजी तहसीलदार यांना निवेदन देऊन पाणी टंचाई दूर करण्याची मागणी केली होती. परंतु, प्रशासकीय यंत्रणा मूगगिळून गप्प बसली आहे. सरपंच, सचिव याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तरी आमच्या मागणीची दखल घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य मधूकर भालेराव, संजय मानवतकर, संतोष मानवतकर, सुनील हिवाळे, मानिक मानवतकर, भानुदास भालेराव यांच्यासह अनेक नागरिक व महिलांनी मागणी केली आहे. आमची मागणी १० दिवसात पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Share This Article
Exit mobile version