– माजी मंत्री आ. बच्चू कडू यांनी डागली तोफ
– शेतकर्यांच्या पाठीशी उभा राहणार; कै. कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही!
– नागरे यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा
सिंदखेडराजा/देऊळगावराजा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील युवा शेतकरी कै . कैलास नागरे यांनी १४ गावातील शेतकर्यांना खडकपूर्णा धरणाचे पाणी मिळावे, यासाठी अनेक आंदोलने केली. परंतु, शासनाने आणि या भागातील लोकप्रतिनिधी यांनी कोणतीच दखल घेतली नाही. याला कंटाळून त्याने होळीच्या दिवशी आत्महत्या केली. त्याअनुषंगाने आज, दि. २६ मार्च रोजी प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष, माजीमंत्री आ. बच्चू कडू यांनी कैलास नागरे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आ. कडू यांनी या भागातील शेतकर्यांशी संवाद साधला. जर धरण उशाला आणि कोरड मतदार संघाला येत असेल तर या भागातील लोकप्रतिनिधी झोपा काढत आहे का? खडकपूर्णा धरणाचे पाणी प्रथम सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांना मिळायला पाहिजे. याचे नियोजन करायला पाहिजे होते. या मतदार संघातील शेतकरी तहानलेला राहीला तर कृषीक्रांती कशी करेल. आज सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात हजारो हेक्टर जमीन कोरडवाहू आहे. पाणी मिळत नाही म्हणून शेतकर्यांना वारंवार आंदोलन करावे लागते. जर शेतकर्यांना धरणाचे पाणी मिळाले नाही तर प्रहार जनशक्ती संघटना आंदोलन करेल. आणि अधिकार्यांना वठणीवर आणेल, असा इशारा त्यांनी दिला. शासनाने मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला नाही तर मी संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आदर्श युवा शेतकरी म्हणून शासन त्याचा सन्मान करते, परंतू या शेतकर्यांची व्यथा शासन समजून घेत नाही. जो पर्यंत शेतकर्यांना शेतीसाठी वीज, पाणी मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होऊ शकत नाही. खडकपूर्णा नदी मतदार संघातून वाहते, या नदीत कोल्हापूरी बंधारे बांधले आहेत. पण यातही पाणी सोडण्यात येत नाही. धरण भरल्यानंतर या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो, त्यावेळी ते पाणी लिप्ट कालव्यातून शिवणी आरमाळ भागातील तलावात सोडण्यात यावे, ही साधी मागणी कैलास नागरे यांची होती. ती जर पूर्ण झाली असती तर १४ गावातील पाण्याचा प्रश्न सुटला असता. तेच पाणी भोगावती नदीपात्रात सोडण्यात आले असते तर कोराडी प्रकल्पाची पाणी पातळी वाढली असती. पण हे निगरगट्ट अधिकारी शेतकर्यांच्या मागणीची दखल घेत नाही. त्यामुळे शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागतात. याला शासन जबाबदार आहे. कैलास नागरे यांनी केलेली आत्महत्या मनाला चटका लावणारी आहे. जर शासन दखल घेणार नसेल तर प्रहार जनशक्ती संघटना डेरा टाकल्याशिवाय राहणार नाही, असेही आ. बच्चू कडू म्हणाले.
श्री पलसिध्द महास्वामी मठाला भेट
शिवणी आरमाळ येथील कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांला भेट दिल्यानंतर माजीमंत्री तथा प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी साखरखेर्डा येथील श्री पलसिध्द महास्वामी मठाला भेट दिली. यावेळी श्री पलसिध्द महास्वामी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मठाचे विश्वस्त विश्वनाथ अप्पा जितकर यांनी त्यांचा सत्कार केला. प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष आदित्य तिवारी यांच्या निवासस्थानी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल , अदित्य तिवारी, अमोल तुपकर, अक्षय तांगडे, प्रतिक तायडे, चेतन राजपूत, हरिश्चंद्र जैस्वाल, शंकर इजाळे उपस्थित होते.

