ना ‘खाऊंगा ‘ना ‘खाने’ दूंगा!; माझ्या नावावर खिसे ‘गरम’ केल्यास खबरदार!

admin 3 Min Read
3 Min Read

– नायगाव दत्तापूर ग्रामपंचायत अधिकारी शेषराव शिंदे यांची व्हायरल पोस्ट चर्चेत!

मेहकर/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ग्रामपंचायत अधिकार्‍याचा गावातील ग्रामपंचायत अंतर्गतील कामात ‘हक्का’चा ‘टक्का’ हे नाते जवळपास सगळीकडेच रूढ आहे. पण तालुक्यातील नायगाव दत्तापूर येथील ग्रामपंचायत अधिकारी शेषराव शिंदे यांनी मी कोणाचाही एक रुपया घेणार नाही व कोणाला घेऊ पण देणार नाही, असा निर्धार केला असून, त्याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर त्यांनी व्हायरल केली आहे. माझ्या नावावर कोणी पैसे घेतल्यास मात्र ‘खैर’ नाही असा निर्वाणीचा इशारादेखील त्यांनी यामधून दिल्याने याबाबतची चर्चा प्रशासनातदेखील होत आहे.

गाव पातळीवर ग्रामपंचायत हे गावाच्या विकासाचे प्रमुख केंद्र आहे. स्वायत्त संस्था असल्याने ग्रामपंचायतला अधिकारसुद्धा आहेत. अलीकडे वित्त आयोगाचा लोकसंख्येच्या प्रमाणात तसेच इतरही लेखाशिर्ष अंतर्गत भरघोस निधी मिळत असल्याने ग्रामपंचायतीकडे निधीचा सोर्स भरपूर असतो. गावात विविध योजना राबवणे, विकासकामे योग्य व चांगल्या दर्जाची करून घेण्यासह ईतर लोकोपयोगी कामासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत अधिकार्‍याची नियुक्ती केली जाते. यापूर्वी त्यांना ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी म्हणत असत. पण ग्रामसेवक मधला की त्याचा विकास कामात ‘हक्का’चा ‘टक्का’ आलाच हा अलिखीत नियम आता अंगवळणी पडल्याचेही दिसून येते. मोठ्या ग्रामपंचायतमध्ये काम करणारे काही ग्रामसेवक तर आपल्या मासिक पगारा ला ‘शिवत’ही नाहीत एवढा ते टक्क्यावर हक्क गाजवतात, अशीही चर्चा आपण कित्येक वेळा ऐकतो. मोठे गाव मिळावे म्हणून काही ‘चतूर’ ग्रामसेवक वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी थोडीही कसर सोडत नाहीत, अशीही चर्चा आपण ऐकतो. विकास कामातील हक्काचा टक्का म्हणजे ‘लाच’ घेण्यासाठी काही जण ‘लाज’ सोडतात व अती झाले की, मग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यातदेखील अडकतात. मात्र एवढे असतानाही ‘चिरीमिरी’ काही कमी झाल्याचे दिसत नाही, अशी चर्चा आपण सर्वदूर ऐकतो तर दुसरीकडे कागदावर ‘ओझे’ ठेवल्याशिवाय कामच होत नाही हा अलिखित नियमही आता अंगवळणी पडला आहे. पण काही कर्मचारी असेही आहेत की, आपण जनतेचे सेवक आहोत, ही जाणीव ठेवत ‘लाच’ घेणे टाळतात. असाच काहीसा दृढ निश्चय मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर येथील ग्रामपंचायत अधिकारी शेषराव शिंदे यांनी केला असून, आपण कोणत्याही काम पैसे घेणार नाही व कोणाला घेऊदेखील देणार नाही. माझ्या गावात ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही कामासाठी तसेच माझे नावावरसुध्दा पैशाची मागणी होत असल्यास मला थेट ९८९०६४०३२८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी या पोस्टमधून केले आहे. एकीकडे भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाल्याचे दिसत असताना ग्रामपंचायत अधिकारी शिंदे यांच्या या निर्धाराची चर्चा अन् कौतुकदेखील होत आहे. याबाबतचा फलकदेखील आपण संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात लावणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी शेषराव शिंदे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.


नायगांव दत्तापूर ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही कामासाठी पैशांची मागणी होत असल्यास, ग्रामपंचायत अधिकारी श्री. एस. पी. शिंदे यांनी नागरिकांना थेट तक्रार करण्याचा आग्रह केला आहे. ‘माझं नाव सांगून जर ग्रामपंचायतीमध्ये कुणी पैसे मागत असेल तर मला थेट फोन करा,’ तक्रारीसाठी संपर्क क्रमांक : ९८९०६४०३२८
———-

Share This Article
Exit mobile version