वाळूतस्करांना जोरदार दणका; खडकपूर्णा जलाशयात आठ बोटी स्फोटकांनी उडविल्या!

admin 3 Min Read
3 Min Read

– दिवसभर धरणात महसूल विभाग व जिल्हास्तरीय शोधपथकाची धडाकेबाज कारवाई
– कारवाईच्या भीतीपोटी अनेक बोटी मालकांनी स्वतःच बोटी पाण्यात बुडविल्या!

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पात अवैध रेती उपसा करणार्‍या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभागाने जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने शोधमोहीम हाती घेऊन वाळूतस्करांना आज जोरदार दणके दिले. त्यात अनेक बोटी स्वतः मालकांनी भीतीने धरणात बुडवल्याची माहिती आहे, दिवसभर शोधमोहीम चालू ठेवण्यात आली होती. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान मौजे गारखेड व मंडपगाव शिवेजवळ अवैध रेती उपसा करणार्‍या चार फायबर बोटी व चार इंजिन बोटी अशा एकूण आठ बोटी पकडण्यात आल्या, त्यामधील मजूर पळून गेले. त्यामुळे कोणाच्या आहेत, त्याची माहिती मिळू शकली नाही. त्या आठ बोटी किनार्‍यावर आणून स्फोटके लावून नष्ट करण्यात आल्या.

धरणाचा जलाशयाचा मोठा परिसर असल्यामुळे शोध मोहीम घेण्यात घेण्यात अडचणीचा सामना करावा लागला. तरीदेखील बोटींचा शोध घेण्यात आला. बेशरमांच्या झाडीमध्ये ह्या बोटी लपविण्यात आल्या होत्या. त्या बोटीपर्यत पोहोचण्यास अडचणी आल्या, तसेच त्यानंतर नष्ट करण्यासाठीसुद्धा अडचणीचा सामना करावा लागला. जिलेटिनच्या साहाय्याने चार वेळा स्फोट करून नष्ट करण्याची कारवाई रात्री ८ वाजेपर्यंत राबविण्यात आली. आज मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्याबद्दल महसूल टीमचे व शोध पथकातील अधिकारी, कर्मतार्‍यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. खडकपूर्णा धरणामध्ये नियमितपणे मोहीम राबवून कारवाई करण्यात येईल, धरणाच्या जलाशयामध्ये बोटी अवैधरित्या येत असल्यामुळे कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांनी त्याच्या कार्यालयामार्फत मोहीम राबवून बोटीवर कारवाई करण्यात यावी, याबाबत त्यांनासुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
जिल्हधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात उप विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नियंत्रणात ही कारवाई पार पडली. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, काशिनाथ ईप्पर, रामदास मांटे, प्रल्हाद केदार, ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे, परमेश्वर बुरकुल, संजय हंडे, सुरेश डोईफोडे, मधुकर उदार, संजय बरांडे, राजू तागवाले, आकाश खरात, तेजस शेटे, कृष्णा खरात, खडकपूर्णा प्रकल्प उपविभागाचे अधिकारी एस जे तल्हार, शोध व बचाव पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तरासिंग पवार, पोलीस कॉन्स्टेबल गुलाबसिंग राजपूत, संदीप पाटील, सलीम बरडे, प्रदीप सोनुने आणि पोलीस विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण गीते, हेड कॉन्स्टेबल डिघोळे, ठाकरे व सहकारी हजर होते.

Share This Article
Exit mobile version