पाठलाग करणार्‍या पोलिसांच्या दुचाकीला दारूविक्रेत्याने लाथ मारली; पोलिस कर्मचारी जागीच ठार!

admin 3 Min Read
3 Min Read

– मिसाळवाडी ते शेळगाव आटोळ रोडवरील भरदुपारचा थरार; पोलिस कॉन्स्टेबल राम आंधळे गंभीर जखमी
– अंढेरा पोलिसांकडून पळून गेलेल्या अवैध दारूविक्रेत्याचा कसून तपास सुरू!

चिखली (प्रताप मोरे) – अवैध दारूविक्रेत्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याच्या भरधाव दुचाकीला अवैध दारूविक्रेत्याने लाथ मारल्याने ही दुचाकी झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात अंढेरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी भागवत गिरी यांचा दुर्देवी मृत्यू झाला असून, पोलिस कॉन्स्टेबल राम आंधळे हे गंभीर जखमी झाले आहेत. शेळगाव आटोळ ते मिसाळवाडी फाट्यादरम्यान हा भीषण प्रकार आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला. जखमी अवस्थेतील गिरी व आंधळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कृष्णा मिसाळ यांनी तातडीने चिखली येथे हलविले. आंधळे यांची तब्येत आता ठीक आहे. या घटनेने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला पकडण्यासाठी ठाणेदार रूपेश शक्करगे यांनी जोरदार फिल्डिंग लावली असून, पोलिस अधीक्षकांनीदेखील या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे.

शिवणकर नावाचा अवैध दारूविक्रेता शेळगाव आटोळजवळील एका ढाब्यावर अवैध दारूचा तसेच परिसरात अवैध दारूविक्रेत्यांना दारूचे बॉक्स सप्लाय करण्याचा धंदा करतो. तो आज दारूचे बॉक्स घेऊन येणार असल्याची खबर पोलिस कॉन्स्टेबल राम आंधळे व भागवत गिरी यांना मिळाली होती. या दोघांनी या शिवणकर याला पाहून थांबण्याचा इशारा केला असता, हा शिवणकर पळून जाऊ लागला. त्यामुळे या दोघांनी त्याचा पाठलाग सुरू केला.

भागवत गिरी

शेळगाव आटोळकडे जात असताना मिसाळवाडी फाट्याच्या पुढे या अवैध दारूविक्रेत्या शिवणकरने पोलिसांच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे भरधाव वेगातील दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. दुचाकीवरील गिरी व आंधळे हे धडक बसून खाली कोसळले. त्यात डोक्याला मार लागून व रक्तस्त्राव होऊन गिरी हे जागीच ठार झाले, तर आंधळे हे गंभीर जखमी झालेत. हे दोघेही अक्षरशः दगडाच्या खाईत आणि काट्यात पडलेले होते. त्यांना शेळगाव आटोळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बाजार समितीचे संचालक कृष्णा मिसाळ व त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने चिखली येथील रूग्णालयात हलवले. परंतु, तोपर्यंत गिरी यांची प्राणज्योत मालवली होती. दारूविक्रेता शिवणकर हा पळून गेला असून, अंढेरा पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. ठाणेदार रूपेश शक्करगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, आंधळे यांच्या प्रकृतीचीही चौकशी करून घडलेला प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. तसेच, आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. लवकरच आरोपी जेरबंद केला जाईल, असे त्यांनी सांगितले.


दरम्यान, शेळगाव आटोळमध्ये दवाखाना परिसरात खुलेआम अवैध दारूविक्री सुरू असून, येथील एका ढाब्यावरदेखील अवैध दारूविक्री होते. तसेच, मिसाळवाडीसह परिसरातदेखील अवैध दारूविक्रीला जोर आला आहे. ठाणेदार रूपेश शक्करगे यांनी तातडीने ही दारू विक्री रोखावी, अशी मागणी पुढे आली आहे.

Share This Article
Exit mobile version