– मुंबईपर्यंत उपचार केले पण मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने मावळली प्राणज्योत!
– चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत; क्षुल्लक वादातून चौघांनी घेतला जीव!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या गोरेगाव येथील एका व्यक्तीला क्षुल्लक कारणावरून दि. १८ मार्च रोजी मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्या व्यक्तीचा आज, दि. २३ मार्चरोजी मृत्यू झाला आहे. या मारहाणप्रकरणातील चारही आरोपींना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. तसेच, त्यांच्यावर खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
उमनगाव येथील रामदास संपत खिल्लारे यांचे डिगाबंर कव्हळे यांच्यासोबत भांडण झाले होते. रामदास खिल्लारे आणि शोभा भावलाल कव्हळे यांचे शेतजमीन जवळजवळ असल्याने रामदास खिल्लारे हा शेतातील कामात मदत करीत होता. श्रीमती शोभा भावलाल कव्हळे यांच्या घरी जाणे-येणे वाढल्याने डिगांबर कव्हळे यांनी रामदासला हटकले. त्यादिवशी रामदास आणि डिगांबर यांच्यात भांडण झाले होते. याचा राग शोभा भावलाल कव्हळे यांना आला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे कंपनीत काम करीत असलेल्या दोन्ही मुलाला बोलावून नात्याने दीर लागत असलेल्या डिगांबर कव्हळे यांचा काटा काढण्याचे आदेश दिले. मुलांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता डिगांबर कव्हळे यांच्या डोक्यात कुर्हाडीने आणि लोखंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले होते. उपचार करण्यासाठी जावई गोपाल शिराळे यांनी त्यांना मुंबईपर्यंत नेले. परंतु, आज दि. २३ मार्च रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दि.१८ मार्चला रामदास खिल्लारे याने मागील भांडण उकरून काढीत डिगांबर कव्हळे यास शिवीगाळ करीत डोक्यात दगड मारला. कृष्णा कव्हळे हा जाब विचारायला गेला असता, रामदास खिल्लारे यांच्यासोबत असलेले आकाश भावलाल कव्हळे, राहूल भावलाल कव्हळे यांनीही शिवीगाळ करीत डिगांबर कव्हळे यास लोखंडी रॉड, कुर्हाड आणि लाठ्याकाठ्याने जबर मारहाण केली. यात डिगांबर कव्हळे यांच्या डोक्यात जबर मार लागला व रक्तबंबाळ झाले होते.
गंभीर अवस्थेत त्यांना प्रथम बुलढाणानंतर जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मेंदुला जबर मार लागलेला असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले होते. यात कृष्णा कव्हळे हा मध्ये आला असता हाही जखमी झाला होता. या तिघांनी त्यालाही मारहाण करून जखमी केल. या प्रकरणात श्रीमती शोभा भावलाल कव्हळे यांनी उपरोक्त तिघांना रॉड, कुर्हाड, काठी घरातून आणून दिली आणि मारण्यास प्रवृत्त केले. उपरोक्त घटना संतोष कव्हळे, सागर शिराळे, गोपाल शिराळे, रामचंद्र कव्हळे यांच्या समक्ष घडली. कृष्णा डिगांबर कव्हळे यांच्या तंक्रारीवरुन साखरखेर्डा पोलिसांनी आकाश भावलाल कव्हळे, राहूल भावलाल कव्हळे, श्रीमती शोभा भावलाल कव्हळे राहणार गोरेगाव आणि रामदास संपत खिल्लारे उमनगाव यांच्याविरोधात कलम १०९, ११८(२) , ११५(२) , २९६ , १५१ (२) , ४९ , ३(५) बीएन एस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती. २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. दि. २२ तारखेला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आज डिगांबर कव्हळे यांचा मृत्यू झाल्याने साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी चारही आरोपी विरुध्द कलम १०३(२) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

