‘ना नल, ना पाणी; डोळ्यातून वाहते पाणी!

admin 3 Min Read
3 Min Read

– राष्ट्रीय पेयजल योजनेची जिल्ह्यात ५०हूनअधिक कामे सुरू; पण एकही पूर्ण नाही!
– पाणी सुरू असल्याची अधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधीलाच दिली चक्क खोटी माहिती!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत राष्ट्रीय पेयजल योजना आणली, या योजनेअंतर्गत सिंदखेडराजा तालुक्यात ५०हून अधिक ठिकाणी काम सुरू आहे. गेल्या चार वर्षांत एकही योजना पूर्ण झाली नाही. ‘ना नल, ना पाणी जल जीवन की अधुरी कहानी’ अशी अवस्था या योजनेची झाली आहे.

शिंदी या गावाची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास असून, या गावांसाठी राष्ट्रीय पेयजल योजना २०२१-२०२२ साली मंजूर झाली. संबंधित ठेकेदार यांनी प्रथम गायखेडी (साखरखेर्डा) येथील तलावात विहीर खोदली. त्या विहिरीजवळ रूम तयार करण्यात आली. तेथून शिंदी गावापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली. जलकुंभ बांधकाम करण्यात आले. गावात अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आली. वरवर ही कामे दिसत असली तरी या योजनेची अनेक कामे रेंगाळत ठेवून ठेकेदाराने पलायन केले. वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत असल्याने या योजनेचा बोर्‍या वाजला काय! याचे काही एक देणंघेणं यांना नाही. असेच सिंदखेडराजा तालुक्यातील नळयोजनांची कामे पाहिल्यावर लक्षात येते.

सदर राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम २०२१ साली सुरु झाले. कामाचा दर्जा आणि अपूर्ण अवस्थेत काम असल्याने शिंदी गावात पाणी पुरवठा झाला नाही. याची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी.
– साधना अशोक खरात, सरपंच, शिंदी
—–
शिंदी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले आहे. आणि पाणी पुरवठा सुरु आहे.
– गिरीश मालोकार, उपविभागीय अभियंता, पाणी पुरवठा, सिंदखेडराजा

शिंदी येथील योजना एक कोटी ९० लाखांची असून, विहिरीचे काम इस्टीमेटनुसार नाही. मोटारपंप बसविला नाही, रुममध्ये ना मिटर, ना सुरु करण्याची साधने उपलब्ध नाही. पाईप लाईन शेतातून असल्याने शेतकरी पिक पेरलेले असताना दुरुस्ती करीता खड्डे खोदून काम करु देत नाही. सदर पाईप लाईन ही राताळी शिंदी रस्त्याने करण्यात आली नाही. जलशुद्धीकरण प्रकल्प नाही आणि गावात पाणी पुरवठा झाला नाही. या योजनेतून ९५ टक्के बील काढून ठेकेदार मोकळा झाला आहे. त्यामुळे ही राष्ट्रीय पेयजल योजना नेमकी कोणासाठी झाली? हा प्रश्न उभा ठाकत आहे. या योजनेतून गावाची तहान तर भागत नाही, पण ठेकेदार आणि अधिकार्‍यांनी आपली तहान भागविली आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नुकतीच आमदार मनोज कायंदे यांनी पाणीटंचाई संदर्भात आयोजित बैठकीत शिंदी येथील कामाबद्दल ग्रामसेवक दिनकरराव काळे यांनी प्रश्न मांडला असता कार्यकारी उपअभियंता गिरीश मालोकार यांनी काम पूर्ण झाले असून, पाणी सुरु झाले आहे, अशी माहिती दिली. परंतु, काम पूर्ण करून नळयोजना ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली नाही. पाणीटंचाई बैठकीत अधिकारीच लोकप्रतिनिधीला खोटी माहिती देऊन दिशाभूल करीत असतील तर सर्वच नळयोजनेचे वाटाळे झाल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे, ही कामे सुरू असताना एकही अधिकारी योजनेच्या कामावर जाऊन पाहणी करीत नाही. केवळ कागदी घोडे पुढे करून अहवाल सादर करताना दिसतात. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात अनियमितता आढळून येत आहे, ऐवढे मात्र निश्चित.

Share This Article
Exit mobile version