सिंदखेडराजा तालुक्यातील एकाच दिवशी ४३१ घरकुलांचे भूमिपूजन

admin 3 Min Read
3 Min Read

– तालुक्यात साडेपाच हजार घरकुलांपैकी चार हजार घरकुलांना प्रथम हप्ता वितरीत
– १० पंचायत समिती गणांकरिता १० मिनी बिडीओ यांची नियुक्ती

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – तालुक्यातील घरकुल योजनेला गती देण्यासाठी गटविकास अधिकारी यांची मिशन मोडवर कार्यवाही सुरू केली आहे. घरकुल कामांना गती देण्यासाठी अनोखी संकल्पना राबवित तालुक्यात १० मिनी बिडीओ यांची नियुक्ती केली आहे. आज (दि.२२) ४३१ घरकुलाचे भुमिपूजन एकाच वेळी करण्यात आले आहे. पंतप्रधान आवास योजना टप्पा दोन अंतर्गत सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत आजपर्यत एकूण ५ हजार ५५१ घरकुलांना मंजुरात मिळाली असून, त्यापैकी ४००४ घरकुलांना प्रथम हप्ता वितरीत करण्यात आला आहे.

दरेगाव येथील घरकुलाचे भूमिपूजन करताना सचिव लिंबाजी इंगळे.

हप्ता न मिळाल्याने अनेक ठिकाणी घरकुलाची कामे रखडत पडली होती. घरकुल कामाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी प्रथम हप्ता वितरीत करण्यात आला आहे. आलेल्या लाभार्थ्यांचे काम १०० टक्के सुरू करण्याच्या सुचना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत. स्थानिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकुश म्हस्के यांनी सदर सूचनेच्या अनुषंगाने नियोजन करुन १०० टक्के घरकुलांची कामे सुरु करणे, जिल्हा परिषद अंतर्गत येणारे विविध विकासकामे पूर्ण करणे, कामांची गुणवत्ता तपासणे, प्रलंबीत कामे पूर्ण करुन घेणे, विविध विकास कामांचा नियमीत आढावा घेवून काही समस्या असल्यास त्या सोडविणे यासाठी सिंदखेडराजातील १० पंचायत समिती गणांकरिता १० मिनी बिडीओ यांची नियुक्ती केली आहे.
सदर मिनी बीडीओ हे विस्तार अधिकारी दर्जाचे असून, त्यांनी दि.२१ मार्चरोजी एकाच दिवशी ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह त्यांच्या गणातील गावांमधे जावून तालुक्यातील १०४ गावांपैकी ९० गावांमध्ये एकूण ४३१ घरकुलांचे भूमिपूजन करुन प्रत्यक्षात कामास सुरुवात केली आहे. तसेच विविध विकासकामांना भेटी दिल्या व प्रलंबीत कामे तात्काळ सुरु करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. त्याचप्रमाणे यापुढेदेखील सदर मिनी बीडीओ हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी या कार्यालयांना भेटी देवून त्यांच्या समस्या जाणून घेवून सदर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतील. तसेच, त्यांच्या अधिनस्त ग्रामपंचायतीमधील विविध विकासकामांना भेटी देतील व प्रलंबीत कामे तात्काळ पूर्ण करण्याची कार्यवाही करतील. ग्रामस्थांच्या अडीअडचणी व तक्रारी सोडवतील, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. पंचायत समितीमधील विकास कामाला गती देण्यासाठी गटविकास अधिकारी अंकुश म्हस्के यांनी घेतलेली भूमिका खरोखरच उल्लेखनीय असून, या कामाला अधिकारी आणि कर्मचारी कितपत सहकार्य करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version