स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवा आघाडी विदर्भप्रमुख प्रशांत डिक्करला शेतकर्‍यांकडूनच खंडणीप्रकरणी अटक!

admin 3 Min Read
3 Min Read

– शेतकर्‍यांकडून उकळली पाच लाखाची खंडणी; अन्यायग्रस्त शेतकर्‍यांची पोलिसांत तक्रार!
– जिगाव प्रकल्पातून जास्तीचा मोबदला मिळवून देण्यासाठी घेतली खंडणी?
– शेतकर्‍यांकडून प्रशांत डिक्कराला लोटपाट; पोलिसांमुळे मारहाण टळली

शेगाव/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवा आघाडी विदर्भप्रमुख प्रशांत डिक्कर याच्याविरोधात शेतकर्‍यांनी खंडणी घेतल्याचा आरोप केलेला असून, काल शेगाव तालुक्यातील जिगाव प्रकल्प कार्यालयात प्रशांत डिक्करला शेतकर्‍यांकडून लोटपाट करण्यात आली. पोलिसांनी शेतकर्‍यांच्या तक्रारीवरून खंडणी प्रकरणात डिक्कर याला अटक केली आहे. स्वतःला शेतकर्‍यांचा नेता म्हणविणार्‍या प्रशांत डिक्कर याच्या या कृत्याने शेतकरीवर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, डिक्कर याला मारहाण करण्यासाठी काही शेतकरी पुढे सरसावले असता, त्याच्यासोबत असलेले त्याचे कार्यकर्ते पळून गेल्याचेही दिसून आले.

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकर्‍यांच्या शेती भूसंपादित केलेली असून, त्यासाठी मोबदला शेतकर्‍यांना दिला जात आहे. मात्र हा मोबदला प्रतिहेक्टर ४० लाख रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवून शेतकर्‍यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करीत, आणखीन पैशासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीतील विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हा लाभधारक शेतकर्‍यांना त्रास देत होता, तसा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. काल शेगाव येथील जिगाव प्रकल्पाच्या कार्यालयात शेतकरी व अधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये प्रशांत डिक्कर हा गेला असता, उपस्थित शेतकर्‍यांनी त्याला लोटपाट केली. तसेच, केवळ पोलिसांच्या उपस्थितीमुळे तो मार खाण्यापासून बचावला, अन्यथा तेथेच त्याला तुडविण्याचा शेतकर्‍यांचा इरादा होता, असे काही शेतकर्यांनी सांगितले. नंतर या बैठकीतून डिक्कर याला हाकलून लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे. डिक्कर याने खोटे बोलून आमचे घेतलेले पाच लाख परत द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी डिक्कर याच्याकडे यावेळी केली होती. शेतकरी पैसे परत मागत असताना डिक्कर याने पैसे परत द्यायला नकार दिल्यानंतर शेतकर्‍यांनी डिक्कर याला मारहानीचा प्रयत्न केला, तर यावेळी डिक्कर याचे सोबत आलेले कार्यकर्ते पळून गेले. याच घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रशांत डिक्कर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. यावेळी शेतकर्‍यांच्यावतीने संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ या गावाच्या सरपंचा पुष्पा संदीप मोरखडे यांनी रीतसर शहर पोलिसात तक्रार नोंदविली. यावरून प्रशांत डिक्कर याच्या विरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास शेगाव पोलिस करत आहेत.


स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर हे शेतकर्‍यांनाच ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून आमिष दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार करीत आहे. अशी तक्रार शेतकर्‍यांनी पोलिसात नोंदविली आहे. आमची एवढीच मागणी आहे की डिक्करांनी आम्हाला मिळत असलेल्या आर्थिक मोबदल्यात ढवळाढवळ करू नये व ब्लॅकमेल करू नये व डिक्कर यांचेवर पाच लाख घेतल्याप्रकरणी खंडणीची कारवाई करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
– पुष्पा मोरखडे (तक्रारकर्त्या)
—————

Share This Article
Exit mobile version