– चोरटी वाहने हुडकून काढण्यासाठी ठाणेदार रूपेश शक्करगे यांनी वापरले ‘एलसीबी’चे सूत्र! – बेकायदेशीर वाहने, चोरीची वाहने बाळगणार्यांची आता खैर नाही!
चिखली (प्रताप मोरे) – चोरीची वाहने बिनधास्तपणे वापरली जात असून, काही वाहनांना दंड पडलेला असतो. अशा वाहनाच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी आपली एलसीबी विभागाच्या गुपित सूत्रांचा वापर करून सर्व पोलीस पाटलांना गावातील, दुचाकी, स्कूटर, मोटारकार, ट्रक टिप्पर यांसारखी वाहतुकीची प्रत्येक घरोघरी जावून गाडी नंबर, मालकाचे नाव अशी नोंद घेवून पोलिस स्टेशनला द्यावी, अशी माहितीची विचारणा केली जात असल्याने गावाकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत ४८ गावाचा समावेश असून, या गावात शांतता कायम टिकून राहवी, यासाठी ४८ गावाचे पाच बीटमध्ये विभाजन करण्यात आले आणि मेरा बुद्रूकचा कारभार बीट जमादार देढे, शेळगाव आटोळं बीट रामेश्वर आंधळे , मेरा खुर्द बीट, सिद्धार्थ सोनकांबळे, दिग्रस बीट रामेश्वर आंधळे , अंढेरा बीट गजानन वाघ यांच्यावर सोपावले आहे. तसेच हे पोलिस स्टेशन पूर्वीपासून गुन्ह्याच्या आकडेवारीत जिल्ह्यात आघाडीवर आहे. ठाणेदार व पोलीस हे डोळ्यात तेल टाकून चोरट्यावर नजरा ठेवून आहेत. मात्र गुन्हेगार हे पोलिसांच्या नजरा चुकून गंभीर गन्हे घडवितात. त्यात अनेक चोरीची वाहने असतात तर काही जणांजवळ चोरीची वाहने आहेत. परंतु ही वाहने खरोखर चोरीची आहेत का, यांचा शोध घेता येत नाही. मात्र यापुढे चोरांची गय केली जाणार नाही, या हेतूने एलसीबी विभागातून नुकतेच अंढेरा ठाणेदार म्हणून आलेले रुपेश शक्करगे यांनी हद्दीतील सर्व पोलीस पाटलांना बोलावून तसेच त्यांना मॅसेज करून सूचना दिल्या की, आपण आपल्या गावातील व्यक्तीकडे टूव्हीलर, थ्रीव्हीलर, फोर व्हीलर, ट्रक, टिप्पर, आदी प्रकारच्या वाहनाची घरोघरी जावून नोंद घ्यावी, व त्या वाहनाचा प्रकार, वाहन क्रमांक, वाहन मालक यांचे नावे शोधून त्याचा अहवाल पोलीस स्टेशनला द्यावा. अशा सूचनाचे पालन करीत पोलीस पाटील आपआपल्या गावात प्रत्येक वाहनाची माहिती घेत आहेत. मात्र अनेक कुंटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होवू शकतात, या भीतीपोटी आपल्या वाहनाची माहिती देत नाहीत. त्यामुळे पोलिस पाटलांची चांगलीच डोकेदुखी बनली आहे. जर या माहिती आधारे अनेक वाहने चोरीची अथवा काही भानगडीची आढळून आल्यास ठाणेदार रुपेश शक्करगे काय पाऊले उचलतील, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
याबाबत पोलिस पाटील गजानन केदार यांनी सांगितले की, आम्हा सर्वांना सांगितले की प्रत्येक घरोघरी जावून वाहनाची माहिती घ्यावी. मात्र माहिती घेत असताना अनेकांजवळ विना नंबरची वाहने आहेत. काही जणं तर शासनाने सुरु केलेल्या योजना वाहनामुळे बंद होवू शकतात, या भीतीपोटी वाहन किंवा वाहनाचे नंबर देणे टाळत आहेत, असे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगण्यात आले.