तब्बल एक वर्षानंतर शेळगाव आटोळ गावाचा पाणीपुरवठा सुरू!

admin 3 Min Read
3 Min Read

– डॉ. विकास मिसाळ यांच्यासह सरपंच संतोष बोर्डे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी दिला होता पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाचा इशारा!

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ या गावाला पाणीपुरवठा करणारी योजना ही मागील एका वर्षापासून बंद असल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर योजनेद्वारे शेळगाव आटोळ गावाचा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा, अन्यथा दिनांक १८ मार्च २५ रोजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, सरपंच संतोष बोर्डे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव देशमुख, कैलास बोर्डे, सौ.मुक्ता देशमुख, सौ. वनिता मिसाळ, सौ. आशा बोर्डे आणि सरपंच संघटना तालुका अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांना दिले होते. यावेळी मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील मिसाळ हेदेखील उपस्थित होते. या निवेदनाची दखल घेत सबंधित विभागाकडून दिनांक १८ मार्चरोजीच शेळगाव आटोळ गावाचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे डॉ. मिसाळसह त्यांच्या सहकार्‍यांनी आपले आंदोलन स्थगित केले आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे आभारसुद्धा मानले आहेत.

सविस्तर असे, की शेळगाव आटोळ तालुका चिखली जिल्हा बुलडाणा या गावाला शेळगाव आटोळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु मागील एका वर्षापासून या योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना खाजगी व्यक्तीकडून पाणी विकत घ्यावे लागत होते. सदर योजना दुरुस्तीसह पाण्याचा स्त्रोत वाढविण्यासाठी धरणात २ इंटेक वेल घेणे, जॅक वेल खोलीकरण करणे, गावापर्यंत व आवश्यक ठिकाणी गवांतर्गत नवीन पाइपलाइन टाकने, नवीन पाण्याची टाकी बांधकाम करणे इत्यादी कामाकरिता ३ वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे यांनी ४.५० कोटी रुपये निधी मंजूर करून दिला होता. सादर योजना दुरूस्तीचे काम सुरू ठेऊन जुन्या पाइपलाइनव्दारे पाणीपुरवठा करणे शक्य असतानादेखील सबंधित विभागाकडून मागील एका वर्षांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने शेळगाव आटोळ गावाचा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा, अन्यथा १८ मार्च २०२५ रोजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस डॉ.विकास मिसाळ, शेळगाव आटोळ नगरीचे प्र.सरपंच संतोष बोर्डे, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भुजंगराव देशमुख, कैलास शेषराव बोर्डे, सौ. मुक्ता अनिल देशमुख, सौ. वनिता विकास मिसाळ, सौ. आशा शरद बोर्डे यांनी दिला होता. परंतु आंदोलनाच्या दिवशीच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून शेळगाव आटोळ गावाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने आंदोलनकर्ते यांनी आपले आंदोलन स्थगित करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्याबद्दल संबंधित विभागांचे आभार मानून भविष्यात पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवावा, जेणे करून ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही आणि आमच्या सारखे पदाधिकारी यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा डॉ. विकास मिसाळ यांनी व्यक्त केली.

Share This Article
Exit mobile version