– भूमिगत झालेले तुपकर पनवेलजवळील नढाळ येथे पोहोचले अन् पोलिसांनी घातला वेढा
– सत्याग्रह आंदोलन करू द्या, म्हणणार्या तुपकरांना पोलिसांनी रोखले; प्रचंड संघर्षानंतर केली अटक
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – शेतकरी कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीन, कापसाला भाव यासह शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन-कापूस अरबी समुद्रात बुडविण्यासह सातबारे समुद्रात बुडवून कर्जमुक्ती झाल्याचे घोषित करण्याचे सत्याग्रह आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. हे आंदोलन राज्य सरकारने आधी बुलढाणा व आता रायगड पोलिसांच्या बळावर सत्तेच्या टाचाखाली अक्षरशः चिरडून टाकले आहे. पनवेलजवळील नढाळ येथे जमलेल्या शेतकर्यांना व तेथेच अचानक आलेल्या रविकांत तुपकरांना रायगड पोलिसांनी वेढा घालून ताब्यात घेतले. शेकडो शेतकर्यांसह तुपकर व त्यांच्या पत्नी अॅड. शर्वरीताई तुपकर यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. आम्ही शांततेच्या मार्गाने सत्याग्रह आंदोलन करणार आहोत, आम्हाला मुंबईत जाऊ द्या, असे सांगणार्या तुपकरांना पोलिसांनी प्रचंड ताकदीच्या बळावर नढाळ येथे रोखले व अखेर ताब्यात घेतले. यावेळी पोलिस व शेतकरी यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता. यावेळी शर्वरीताईंसह महिला आंदोलकांना धक्काबुक्की झाल्याचेही दिसून आले. दरम्यान, काल राज्यातील फडणवीस सरकारने बुलढाणा पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे बुलढाण्यातील सर्व पदाधिकार्यांना बेकायदेशीररित्या अटक करून पोलिस ठाण्यात डांबले होते. त्यामुळे शेतकर्यांचा मोठा उद्रेक निर्माण झाला होता. या उद्रेकापुढे अखेर राज्य सरकार झुकले व काल बेकायदेशीररित्या अटक केलेल्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना तब्बल २० तासानंतर घरून उचलले तसे घरी नेऊन सोडले आहे.
बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केले आंदोलन यशस्वी, सातबारे, सोयाबीन समुद्रात बुडवलीच!
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकार आणि पोलिसांनी आकाश पाताळ एक केले. रविकांत तुपकर यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांना अटक केली. एवढ्यानंतरही काही शेतकऱ्यांनी मुंबई पोलिसांची तटबंदी भेदत अरबी समुद्रात कर्जाचा बोजा असलेल्या सातबारा तसेच सोयाबीन व कापूस बुडवत स्वतःला कर्जमुक्त घोषित केले. या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या या बहाद्दर पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे व त्यांचे सहकारी बुधवारी (दि. 19) दुपारी मुंबई पोलिसांची तटबंदी भेदून बोटीद्वारे अरबी समुद्रात दाखल झाले. जवा पिकलं तवा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, म्हणत अरबी समुद्रात कर्जाचा बोजा असलेल्या सातबारा तसेच कवडी मोल भाव मिळाल्याने तीन वर्षापासून घरात पडून असलेला कापूस व सोयाबीन अरबी समुद्रात बुडवले. यावेळी आम्ही कर्जमुक्त होणारच, अशा घोषणा दिल्या. तसेच रविकांत तुपकर व आंदोलक शेतकऱ्यांना खालापूर पोलिसांनी बळाचा वापर करून केलेल्या बेकायदेशीर अटकेचा जाहीर निषेध नोंदवला. मुंबईच्या प्रत्येक चौकात प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही तुपकरांचे क्रांतिकारी शिलेदार अखेर अरबी समुद्रात बोटीद्वारे पोहचले व त्यांनी सोयाबीन व सातबारे फेकून प्रतिकात्मक आंदोलन यशस्वी केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
दरम्यान, दुपार झाली तरी पोलीस बाहेर पडू देत नसल्याने शेवटी बारा वाजता रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी अरबी समुद्राकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. अतिशय रखरखत्या उन्हात पोलिस आणि शेतकरी कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. तब्बल तासभर पोलीस व शेतकरी यांच्यात संघर्ष सुरू होता. शेतकरी घोषणा देत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते तर शेकडो पोलिसांची बटालियन काठ्या आडव्या लावून त्यांना मागे सारत होती. शेवटी रविकांत तुपकर व त्यांच्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करत खालापूर पोलीस ठाण्यात अटक करून नेले. दरम्यान, सरकारने पोलिसांचे प्रचंड बळ वापरून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
लाठ्या आणि बंदूक घेऊन आलेल्या पोलिसांना जेवण- पाणी देण्याची दानत शेतकऱ्यांमध्येच!
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मुंबईतील आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी प्रचंड बळाचा वापर केला. सरकारच्या इशाऱ्यावर रविकांत तुपकर व त्यांचे कुटुंबीय, शेतकरी कार्यकर्ते यांचा अक्षरशः छळ केला. शेतकऱ्यांना एक पाऊलही पुढे टाकू द्यायचे नाही यासाठी पोलीस काठ्या आणि बंदुका घेऊन आले होते. याही परिस्थितीत भल्या पहाटेपासून रात्री पर्यंत शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या पोलिसांच्या पाणी, चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली. दुश्मनावरही दातृत्व दाखवण्याची दानत केवळ शेतकऱ्यांमध्येच असल्याचे यातून दिसून आले.
..अखेर तुपकर समर्थकांनी अरबी समुद्रात बोटीतून सातबारा व सोयाबीन बुडवलेच..!
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकार आणि पोलिसांनी आकाश पाताळ एक केले. एवढ्यानंतरही बीडचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बहाद्दर शिलेदार कुलदीप करपे व त्यांचे सहकारी बुधवारी (दि. 19) दुपारी मुंबई पोलिसांची तटबंदी भेदत बोटीद्वारे अरबी समुद्रात दाखल झाले. जव्हा पिकलं तव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, म्हणत अरबी समुद्रात कर्जाचा बोजा असलेल्या सातबारा तसेच कवडी मोल भाव मिळाल्याने तीन वर्षापासून घरात पडून असलेला कापूस व सोयाबीन अरबी समुद्रात बुडवले. यावेळी आम्ही कर्जमुक्त होणारच अशा घोषणा दिल्या. तसेच रविकांत तुपकर व आंदोलक शेतकऱ्यांना खालापूर पोलिसांनी बळाचा वापर करून केलेल्या बेकायदेशीर अटकेचा जाहीर निषेध नोंदवला.पोलिसांना गुंगारा देऊन तुपकर समर्थकांनी समुद्रात प्रतिकात्मक आंदोलन केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
शांततेत सत्याग्रह करू द्यायचा नसेल तर आम्हाला गोळ्या घाला : रविकांत तुपकर
कर्जाचा बोजा असलेले सातबारा अरबी समुद्रात बुडवण्यासाठी निघालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शेतकर्यांना पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरच रोखले होते. यावेळी तुपकर म्हणाले, की अटक केली म्हणून आंदोलन थांबणार नाही. घरच्या भाकरी बांधून, पोलिसांना चकवा देत शेकडो किलोमीटर प्रवास करून आम्ही येथे आलो आहोत. माघारी फिरणार नाहीत, आणि थांबणारही नाहीत. पोलिसांना विनंती आहे, आम्हाला शांततेत आणि संवेदनशील मार्गाने आंदोलन करू द्या. आंदोलन करू द्यायचे नसेल तर आम्हाला गोळ्या घाला. आत्महत्या करून मारण्यापेक्षा सरकार आणि पोलिसांच्या गोळ्यांनी मेलो तर शहीद तरी होऊ. पण लक्षात ठेवा पोलिसांकरावी सरकारने आमचे जगणे मुश्कील केले तर आम्हीदेखील तुमचे जगणे मुश्कील करू. आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता. यामुळेच बापाच्या घामाच्या दामासाठी लढत आहोत. पोलिसांनी अडवाअडवी करू नये. तुम्हीदेखील आमचे भाऊ आहात. तुमचा आम्ही सन्मानच करतो. शांतता आणि संवैधानिक मार्गाने आम्हाला आंदोलन करू द्या, असे आवाहन याप्रसंगी रविकांत तुपकर यांनी केले होते. परंतु, रायगड पोलिसांनी तुपकरांसह शेतकर्यांना मुंबईत जाऊ दिले नाही, व तेथेच धरपकड केली. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकर्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा, कापूस व सोयाबीनला प्रतिक्विंटल तीन हजार रूपये भाव फरक द्यावा, कांदा, दूध, धान उत्पादक शेतकर्यांना अनुदान द्यावे, उसाला एफआरपीप्रमाणे एक रकमी मोबदला व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, कल्याण रेल्वेमार्गामुळे विस्थापित झालेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करावे, आदी मागण्या शेतकर्यांनी केल्या आहेत.
क्रांतीकारी संघटनेच्या प्रमुखांची २० तासानंतर सुटका
– अधिवेशनात शेतकरीप्रश्न दुर्लक्षीत होत असल्याने आंदोलनाची वेळ – विनायक सरनाईक

