– शिंदे गटाकडून नंदूरबारच्या चंद्रकांत सूर्यवंशी यांना विधान परिषदेवर संधी!
– अजित पवार गटाने अमरावती येथील संजय खोडके यांना दिली संधी; आता पती-पत्नी विधीमंडळात!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – शिंदे गटाने माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्याऐवजी नंदूरबारचे चंद्रकांत सूर्यवंशी यांना विधानपरिषदेवर संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द देऊनही डॉ. रायमुलकर यांचे राजकीय पुनर्वसन टाळले गेले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून डॉ. रायमुलकर यांचा राजकीय वनवास सुरू असून, त्यांनी शिवसेनेत थांबून ठाकरेंना साथ दिली असती तर तेच आता आमदार असते, अशी लोकचर्चा आता त्यांच्या मतदारसंघात सुरू आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत एकही उमेदवार जाहीर केलेला नाही, त्यामुळे महायुतीच्या पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संजय केनेकर, वर्धा येथील दादाराव केचे आणि नागपूर येथील संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.त्यानंतर सोमवारी सकाळी शिंदेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक दिग्गजांना डावलून अमरावती येथील अजित पवार यांचे निकटवर्तीय संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपचे आमदार प्रवीण दटके, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार रमेश कराड तसेच, शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आमदार राजेश विटेकर या पाच आमदारांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पाच जागांवर निवडणूक होणार आहे. हे पाचही आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या पाच रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे.

