सैलानी यात्रेला होळीने सुरूवात; लाखो भक्तांनी होळीचे घेतले दर्शन!

admin 3 Min Read
3 Min Read

– जवळपास २५ ते ३० ट्रक भरतील एवढ्या नारळांची होळी; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
– तब्बल ११८ वर्षांची परंपरा जपणारा सोहळा; लाखो भविक दर्शनासाठी सैलानीत!

चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील सैलानी येथे धार्मिक एकतेचे प्रतीक असलेली आणि भाविकांची श्रद्धास्थान ठरलेली नारळांची होळी आज, दि. १३ मार्चरोजी पौर्णिमेनिमित्त पेटविण्यात आली. सुमारे २५ ते ३० ट्रक भरतील एवढ्या नारळांची आहुती या होळीत देण्यात आली. तर देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी या होळीचे दर्शन घेतले. गेल्या ११८ वर्षापासूनची ही परंपरा मोठ्या श्रद्धेने पाळली जाते. या होळीसाठी दोन दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी सैलानीबाबा दर्ग्याच्या परिसरात झाली होती.

महाराष्ट्र व राज्याबाहेरील देशभरातल्या लाखो हिंदू व मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानीबाबांच्या यात्रा महोत्सवाला आज, दि. १३ मार्च रोजी होळीच्या दिवसांपासून प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी सैलानी दर्गा परिसरालगतच्या मैदानावर लाखो नारळाची विशाल होळी पेटवण्यात आली. यंदा यात्रेचे या यात्रेचे ११८ वे वर्ष असून, या नारळाच्या होळीलादेखील ११८ वर्षांची शतकोत्तर परंपरा लाभली आहे. आज पंचवीस ते तीस ट्रक भरतील एवढ्या लाखो नारळांची होळी पेटवण्यात आली. दुर्धर शारीरिक व्याधी आणि मानसिक आजारांनी ग्रस्त असलेले लाखो भाविक या आजारांमधून आपली सुटका व्हावी, यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या श्रद्धेने सैलानीबाबांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. आज पेटलेल्या होळीमध्ये आपल्यावरील इडापिडा टळावी यासाठी काळे बाहुले, लिंबू, बिबे, सूया, खिळ्यांनी टाचलेले नारळ मनोरुग्णाच्या अंगाखांद्यावरून ओवाळून टाकण्यात आले. उद्या या होळीतील राख अंगारा म्हणून कपाळी आणि अंगाला लावली जाते. त्यासाठीही प्रचंड संख्येने भाविक गर्दी करतात. आजच्या होळीसाठी जमणार्‍या लाखोच्या संख्येमध्ये संख्येमुळे सैलानी दर्गा परिसरात कुठलाही अनुचित प्रकार व चेंगराचेंगरी होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता रायपूर पोलिस ठाण्याच्यावतीने होळीभोवती चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच संपूर्ण यात्रेत जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आहे. दर्गा परिसरात तात्पुरती पोलिस छावणीही उभारण्यात आली असून, राज्य परिवहन महामंडळाने तात्पुरती बसस्थानके उभारली आहेत. विविध आगारांमधून सैलानी येथे विशेष बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


अनेक वर्षांची परंपरा असलेल्या सैलानी यात्रेतील नारळांची होळी भाविकांसाठी विशेष आकर्षण आहे. ही होळी पहिल्यांदा नजीर मुजावर आणि सैलानी बाबांचे भक्त कदम गुरुजी यांनी दरग्याजवळ सात गौर्‍यांची होळी म्हणून सुरू केली होती. आज ती विस्तारित स्वरूपात साजरी केली जाते. महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविक यात सहभागी होतात. यात्रेतील गर्दी आणि सुरक्षा लक्षात घेता, बुलढाणा व चिखली पालिकेच्या अग्निशमन दलांची तैनाती करण्यात आली होती. तसेच बालकांच्या सुरक्षेसाठी महिला व बालविकास विभागाची विशेष पथके आणि १०९८ चाइल्ड हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. तुफान गर्दी पाहाता, भाविकांच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी सैलानी येथे एक डीवायएसपी, सात पोलिस अधिकारी, ३० पोलिस अमलदार, २ दंगाकाबू पथके, ३०० पोलिस कर्मचारी, २५० महिला पोलिस कर्मचारी आणि २०० होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी एका अज्ञात भाविकाने होळीत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता, असा अनुचित प्रकार यापुढे होणार नाही, याचीदेखील खबरदारी या ठिकाणी घेतल्या गेली आहे.

Share This Article
Exit mobile version