जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीगाठी सुरूच!

admin 4 Min Read
4 Min Read

– काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोडांनीदेखील घेतली ना. शिंदेंची भेट
– ‘मास लीडर’ नसलेले स्थानिक नेतेच शिंदे सेनेच्या वाटेवर का?
– सर्व स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठीच्या मध्यस्थीत आ. संजय गायकवाड!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – काँग्रेसचे तीन टर्म आमदार राहिलेले दिलीपकुमार सानंदा यांनी शिंदे गटाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन काही तास होत नाही तोच, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा बुलढाण्यातील स्थानिक नेते संजय राठोड यांनी ना. एकनाथ शिंदे यांची आज (दि.१२) भेट घेतली. विशेष म्हणजे, या भेटीच्या मध्यस्थीत कालच्या सानंदाभेटीप्रमाणेच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे होते. विशेष म्हणजे, शिंदे गटात जे स्थानिक नेते जात आहेत, त्यांना खा. मुकूल वासनिक यांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठे केलेले आहे. त्यांना मास लीडर म्हणून पाहिले जात नाही. त्यामुळे हे नेते शिंदे सेनेत जाण्याच्या तयारीत असल्याने शिंदे सेनेला या नेत्यांचा नेमका काय फायदा होणार? असाही प्रश्न निर्माण होत आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. मुकूल वासनिक यांचे निष्ठावान सहकारी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. यावेळी आमदार संजय गायकवाड उपस्थित होते. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यानंतरच जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी चढाओढ दिसून येत आहे. त्यामुळे, संजय राठोडही आता काँग्रेसला ‘हात’ दाखविण्याची चिन्हे असून, लवकरच ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून समजली आहे. यापूर्वी, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विजय अंभोरे, काँग्रेस विधानसभा समन्वयक अ‍ॅड. गणेशसिंह राजपूत यांनी मागील आठवड्यातच आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. खामगावचे माजी आमदार सानंदा यांनीदेखील आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून काल, दि.११ मार्चरोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आपण खामगावातील विकासकामांसाठी भेट घेतल्याचे सानंदांनी नंतर स्पष्टीकरण दिले. आपण काँग्रेसमध्येच आहोत, असेही ते सांगायला विसरले नाहीत, व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले मित्र आहेत, अशीही पुष्टी त्यांनी जोडली.
तथापि, यापूर्वी तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा माजी आमदार सानंदा हे खामगावातील एखाद्या कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे ऐकण्यात नाही अन् खामगावात अ‍ॅड. आकाश फुंडकर हे मित्रपक्ष भाजपचे मंत्री असताना त्यांना न विचारता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सानंदा यांना कामाबाबत सहकार्य कसे करतील? असाही सवाल निर्माण होत आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती? याबाबतचे सत्य लवकरच बाहेर येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असताना, आज दि.१२ मार्चरोजी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. मुकूल वासनिक यांचे निष्ठावान सहकारी, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संजय राठोड यांनीही आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. संजय राठोड यांनी युवक काँग्रेस, एनएसयूआय या संघटनांचे प्रदेशाध्यक्ष पददेखील उपभोगले आहे. संघटनेतील विविध महत्वपूर्ण पदे त्यांना खा.मुकूल वासनिक यांच्या माध्यमातूनच मिळाली होती. या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाकडून लढायचे होते पण जागा शिवसेना (ठाकरे) पक्षाला गेल्याने त्यांचा नाईलाज झाला. तेव्हापासूनच त्यांची घालमेल सुरू असल्याची चर्चा आहे.


आता प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील काही नेत्यांची नाराजी उफाळून आली की? त्यांचे नेतृत्वच रुचले नाही म्हणूनच हे नेते शिंदे शिवसेनेची लवकरच वाट धरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्वजिल्ह्यातच काँग्रेसला धक्के बसले तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना जिल्ह्यातही पक्षांतर्गत सद्भावना यात्रा काढावी लागेल, अशीही चर्चा आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी चढाओढ लागल्याने आमदार संजय गायकवाड यांचे राजकीय वजन मात्र चांगलेच वाढत चालले आहे. याबाबत आमदार संजय गायकवाड यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

Share This Article
Exit mobile version