‘जब तक जिंदा हू, काँग्रेसचा का परिंदा हू’; दिलीपकुमार सानंदांनी शिंदे गटात प्रवेशाचे वृत्त फेटाळले!

admin 4 Min Read
4 Min Read

– खामगावमधील विकासकामांसाठी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
– बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचीही होती उपस्थिती

बुलढाणा (बाळू वानखेडे) – खामगावचे तीन टर्म आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले होते. परंतु, हे वृत्त दिलीप सानंदा यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना फेटाळून लावले आहे. मतदारसंघातील काही विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आपण काँग्रेस सोडण्याचा विचारही करू शकत नाही. जब तक जिंदा हू, काँग्रेस का परिंदा हू, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस सोडण्याचे वृत्त फेटाळून लावले. दरम्यान, आ. संजय गायकवाड यांनीही सानंदा व आपण उपमुख्यमंत्री यांची खामगावातील काही विकासकामांसंदर्भात भेट घेतली आहे. पण, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, आज पुण्यातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला असल्याने त्यांच्यासोबत सानंदा यांचा शिंदे सेनेत प्रवेश झाला नसला तरी, योग्य वेळी ते शिंदे सेनेत नक्की येतील, असे त्यांच्या राजकीय निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिलीपकुमार सानंदा म्हणाले, की एकनाथराव शिंदे हे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांची भेट घेणे काही गैर नाही. खामगाव या आपल्या मतदारसंघातील काही कामांसंदर्भात त्यांच्या बोललो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. एकनाथराव शिंदे यांचीच नव्हे तर आज आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचीही भेट घेतली आहे. काँग्रेस सोडण्याचा कोणताही विचार नसून, शिंदे गटात पक्षप्रवेशाच्या चर्चेत काहीही तथ्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे कट्टर काँग्रेसी म्हणून राज्यात परिचित आहेत. खामगाव विधानसभेतील पंचायत समिती, नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, बहुतांश ग्रामपंचायती तसेच जिल्हा परिषदेचे सर्व सर्कलवर काहीकाळ त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. सध्याही खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांच्याच ताब्यात असून, बहुतांश ग्रामपंचायतींवर त्यांच्याच विचाराचे पदाधिकारी आहेत. मास लीडर म्हणून ते परिचीत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते उभेच राहिले नव्हते, तर या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर जवळजवळ २५ हजार मतांनी पराभव झाला. खामगावात भाजपचा आमदार असल्याने त्यांनी शिंदे गटाची वाट निवडली असावी, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे, आजही दिलीपकुमार सानंदा यांना खामगाव विधानसभेसह चिखली विधानसभेतही मानणारा मोठा वर्ग आहे. शिंदे सेनेत प्रवेश करण्याबाबत लवकरच ते निर्णय घेणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खामगावात मोठा पक्षप्रवेश सोहळादेखील ठेवणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्यातच काँग्रेसला खिंडार पडत असून, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा शिंदे सेनेत प्रवेश झाला तर काँग्रेसला मात्र मोठे ‘भगदाड’ पडणार असल्याचेही बोलले जात आहे. हर्षवर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष झाल्यामुळे जिल्ह्यातच या निमित्ताने मोठी नाराजी उफाळून येत आहे का? असाही प्रश्न चर्चिला जात आहे. जिल्ह्यातील शिंदे सेनेत मोठे प्रवेश होत असल्याने आमदार संजय गायकवाड यांचे मुंबई दरबारी मोठे वजन वाढत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास आणखी दृढ होत असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.


दरम्यान, दिलीपकुमार सानंदा यांच्या आजच्या भेटीगाठीबाबत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना विचारले असता, मागील आठवड्यातच माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायचे होते, परंतु भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आज दिलीपकुमार सानंदा यांना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सानंदा यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मात्र कोणतीही चर्चा झाली नाही, असेही ते म्हणाले.

Share This Article
Exit mobile version