– महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध वाळू वाहतूक सुरू!
– अवजड वाहतुकीने रोडची बनली दयनीय अवस्था; डांबरीकरण उखडले!
चिखली (प्रताप मोरे) – तालुक्यातील मेरा बुद्रूक ते अंढेरा रोडचे डाबरीकरण एका वर्षापूर्वी करण्यात आले होते. परंतु या रोडचे निकृष्ट दर्जाचे काम आणि रोडची जास्त वाहतुकीची क्षमता नसतांनासुध्दा या रोडवरून रात्रंदिवस अवैध रेतीचे टिप्पर ये-जा करीत आहेत. अवैध रेती वाहतूक करणार्या या टिप्परांमुळे एका वर्षातच रोडचे डाबरीकरण उखडून रस्त्याची फार दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे छोटे मोठे अपघात वाढले असून, या रोडवरील अवैध वाळू वाहतुकीकडे महसूल व पोलिस यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मेरा बुद्रूक ते अंढेरा रोडच्या डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बाधकाम विभाग देऊळगावराजा यांनी मागील वर्षी पूर्ण केले. मात्र डाबरीकरण करतेवेळी अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मिलिभगतमुळे रोडचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. या मेरा बुद्रूक ते अंढेरा रोडवरून लोकांना लांब पल्याच्या शहराला जाण्या-येण्यासाठी फार सोईचा असल्याने जास्तीत जास्त वाहने या रोडवरून ये जा करतात. त्यातच खडकपूर्णा जलाशयाच्या नदी पात्रातून अवैधरित्या वाळूमाफिया हे रेतीचा उपसा करुण चोरट्या मार्गाने अंढेरा ते मेरा बुद्रूक रोडवरून दिवरात्र अवैध रेतीचे टिप्पर भरधाव वेगाने धावतात. या रेतीच्या जड वाहतुकीमुळे रोडवरील डाबरीकरण उखडून रस्त्याची चाळणी होवून गेली आहे. टिप्पर चालक कोणाच्याही जीवाची पर्वा न करता गावातून भरधाव वेगात टिप्पर चालवितात. त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडतं असल्याने गावाकर्यांना आपला जीव मुठीत घालून रस्ता ओलांडून जावे लागत आहे. या बाबत गावाकर्यांनी अवैध रेतीचे टिप्पर अडवून संबंधित अधिकार्यांना माहिती दिली जाते. परंतु वाळूमाफियाच्या हप्तेखोरीमुळे अधिकारी गावाकर्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात. तर काही वेळा टिप्परचालक अरेरावीही करतात. अशा या वाळूमाफियांच्या त्रासाला नागरिक वैतागले आहेत. बांधकाम खात्याने तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे व महसूल आणि पोलिसांनी या रोडवरून चालणारी अवैध वाळू वाहतूक रोखावी, अशी मागणी ग्रामस्थांनी दिली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाच्या तयारीत ग्रामस्थ आहेत.

