– सगळ्या भानगडी बाहेर काढणार; प्रतापरावांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर उपोषण करणार!
—
तुपकरांनी डागली प्रतापरावांवर तोफ!
– प्रतापरावांच्या दबावात काम करणार्या अधिकार्यांनी राजीनामे देऊन त्यांचे घरगडी म्हणून काम करावे
– प्रतापराव जाधव हे प्रचंड खूनशी, एखाद्या कार्यकर्त्याने चांगले कपडे घातले तरी त्यांना सलते
– घरासमोर बेकायदेशीर बँक टाकून कॅमेरे बसविले, मला भेटायला कुणी आलं की त्याला प्रतापरावचा फोन जातो
– प्रतापराव तुमचं मंत्रिपद दीड-दोन वर्षाच्या वरं टिकणार नाही!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मीच कायदा अन् माझाच न्याय म्हणणार्या केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या खूनशी राजकारणामुळे गरीब कुटुंबातील तरूणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधात काम केले, रविकांत तुपकर यांची प्रचार यंत्रणा ताकदीने सांभाळली, मेहकर विधानसभा क्षेत्रात तुपकारांना तोडीस तोड मतदान मिळवून दिले, म्हणून शेतकरी चळवळीतील ज्ञानेश्वर टाले यांना सात जिल्ह्यातून तडीपार केले. एवढ्या खालच्या पातळीच्या राजकारणाची लाज वाटते, अशी तुफान फटकेबाजी करत, खूनशी राजकारण करणार्या केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची दादागिरी व सूडाचे राजकारण खपवून घेणार नाही, असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला. तसेच, प्रतापरावांच्या सगळ्या भानगडी, भ्रष्टाचार बाहेर काढून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी दिल्लीतील घरासमोर उपोषण करून मंत्रिमंडळातून प्रतापरावांची हकालपट्टी करण्याची मागणी करू, असेही तुपकरांनी ठणकावले.
या पत्रकार परिषदेला अॅड. शर्वरीताई तुपकर, डॉ. टाले यांच्या पत्नी कल्पनाताई ज्ञानेश्वर टाले, शेतकरी नेते विनायक सरनाईक, ऋषांक चव्हाण, भगवानराव मोरे, गजानन देशमुख, सदाशिव जाधव, विजय पवार, बाळासाहेब येसकर, राहुल शेलार, भारत गव्हाणे, आकाश माळोदे, नितीन सोनटक्के, अमोल मोरे, सहदेव लाड, वसीम शेख, अनिल पडोळ, कडूबा मोरे, भागवत धोरण, दत्ता पाटील, उमेश राजपूत, कैलास उतपुरे, गणेश गारोळे, देवा आखाडे, प्रवीण उतपुरे, अजहर शेख, नंदकिशोर जाधव, मोहन नवले, हरिभाऊ उबरहांडे, सुहास पाटील, हरिदास असाबे, नीलेश गवळी यासह कायकर्ते उपस्थित होते.
आम्हाला जेलमध्ये टाका, फासावर लटकवा, आम्ही खरेच बोलणार, थांबणार नाही. खा. प्रतापरावांच्या दबावाखाली बुलढाणा जिल्ह्यातील अधिकारी इंग्रजांपेक्षा भयंकर कारभार करत आहेत. खरेतर त्यांच्या दबावाखाली मेहकरचे पोलिस अधिकारी, येथील एसडीओ यांनी राजीनामे दिले पाहिजेत अन् प्रतापराव जाधव यांच्याकडे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे सीईओ यांचा चार्ज दिला पाहिजे. कारण प्रत्येक अधिकार्याला घरी बोलवतात, दादागिरी करतात, त्यांच्यावर दबाव टाकतात. इंग्रजांच्याही काळात एवढी एकाधिकारशाही नव्हती. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एवढी मोठी जबाबदारी चांगले काम करण्यासाठी दिली आहे. त्याचा उपयोग लोकांची कामे करण्यासाठी करावा. खामगाव- जालना रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर चार निवडणुका लढवल्या. आतातरी हा मार्ग पूर्ण करावा. परंतु, खासदार ज्या गावात त्यांना कमी अन् रविकांत तुपकरांना जास्त मते मिळाली, त्या गावातील लोकांची कामे करत नाहीत. एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात कोणीच केले नव्हते. जनता असल्या दडपशाहीच्या राजकारणाला भीक घालणार नाही. लोकांनी यांना यजमान जावू नये. जिथे कुठे अडचण येईल तिथे मी सोबत आहे. कामे करण्यासाठी आमदार- खासदारच असावे, असे काही नाही. सत्तेत कुणीही असले तरी लोकांची कामे करण्याची धमक माझ्यात आहे. चळवळीच्या बळावर रोज आम्ही लोकांची कामे करतो, असे सांगत प्रतापराव यांचे मंत्रीपद दीड- दोन वर्षापेक्षा जास्त काळचे नाही, पद आयुष्यभर पुरणार नाही, याचे भान त्यांनी ठेवावे, असे रविकांत तुपकर म्हणाले.
माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी, माझ्या घरावर कॅमेरे लावलेत!
माझ्या घराच्या गेटसमोर अनधिकृतरित्या बँक टाकली. खरेतर रहिवासी भागात कमर्शिअल बँक टाकताच येत नाही तरी त्यांनी टाकली. त्या बँकेत काळे कुत्रे फिरकत नाही. परंतु, रविकांत तुपकारांच्या घरी कोण येतं? मी आणि माझ्या कुटुंबाची सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून रेकी करण्यासाठी बँक टाकली. एखादा कार्यकर्ता भेटायला घरी आला तर लगेच त्याला खासदारांचा फोन येतो. पाच वर्षापासून मी व माझे कुटुंब हे सारे सहन करत आहोत. बरं एवढे दिवस रेकी करून काय मिळवले. एवढं नीच राजकारण बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्रात यापूर्वी कोणीही केलेले नाही. याची आम्ही तक्रार करणार आहोत. ती बँक हटवण्याची मागणी करणार आहोत, असे रविकांत तुपकर म्हणाले.
एवढी लाचारी करण्यापेक्षा, अधिकार्यांनी खा. प्रतापराव जाधवांच्या घरी कामाला राहावे!
डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावरील आंदोलनातील गुन्ह्यांचा बावू करून तडीपारची कारवाई केली. त्याच पध्दतीने वर्षभरापूर्वी मी लोकसभेला उभा राहू नये म्हणून प्रतापरावांनी कोणतीच केस नसता प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. खालच्या कोर्टाने मागणी फेटाळली तर दबाव टाकून पोलिसांना वरच्या कोर्टात पाठवले. दरम्यान, कोर्टाने न्याय केला अन् त्यांची मागणी फेटाळून लावली. ज्या ज्या वेळी जाधवांनी दबावतंत्राचा वापर करून आमच्यावर खोट्या कारवाया केल्या, त्यावेळी न्यायालयाने दिलासा दिल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले. खरेतर बुलढाणा जिल्ह्यात वरली, मटका, दारू आणि अवैध धंदे खासदारांचेच बगलबच्चे करत आहेत. दोन नंबर धंदेवाले, सराईत गुन्हेगार, भूमाफिया यांना मोकळे सोडून ज्ञानेश्वर टालेंसारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांवर कारवाया केल्या जात आहेत. प्रतापराव जाधवांच्या दबावतंत्राला घाबरून अधिकार्यांंना घरगड्यासारखी त्यांची लाचारी करायची असेल तर त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन प्रतापरावांची चाकरी करावी. शासकीय कार्यालयावर खासदारांच्या कार्यालयाचा बोर्ड लावावा, अशा सडेतोड शब्दात रविकांत तुपकर यांनी रोष व्यक्त केला.
खा. जाधवांकडून त्यांचाच पक्षांच्या आमदारांना पाडण्याचा प्रयत्न; हे कसले पक्षनिष्ठ?
एकनाथ शिंदे यांनी पक्ष वाढवण्यासाठी, जनतेसाठी काही करून दाखवण्यासाठी प्रतापराव यांना एवढे मोठे मंत्रीपद दिले. परंतु, त्यांनी स्वकीयांना पाडण्यासाठी प्रयत्न केले. तसा आरोप त्यांच्याच पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या पक्षाने स्वपक्षातील नेत्यांना पाडण्यासाठीच यांना उमेदवारी दिली होती का? असा प्रश्न पडतो. त्यांच्या पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही; मात्र प्रतापराव यांना स्वपक्षातील एखाद्या कार्यकर्त्याने चांगले कपडे घातले तरी आवडत नाही. सर्व नेते, कार्यकर्ते संपवून त्यांना एकट्यांना जिल्ह्याचा कारभार करायचा आहे. याचे आम्हाला देणेघेणे नाही. परंतु, खालच्या पातळीचे नीच राजकारण आम्ही कदापिही खपवून घेणार नाही, असे तुपकर म्हणाले.

