अवघ्या चोवीस तासांत केळवद घरफोडीतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या!

admin 3 Min Read
3 Min Read

– चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीला गेलेले सोनेही केले हस्तगत!

चिखली (महेंद्र हिवाळे) – केळवद येथील घरफोडीच्या घटनेचा चिखली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत उलगडा केला असून, आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे. तसेच, आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोनेही जप्त करण्यात आले आहे. चिखली पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली.

आरोपीच्या ताब्यातून हस्तगत केलेले सोने.

सविस्तर असे, की काल, दि. ९ मार्चरोजी राजेंद्र बाबूराव पाटील वय ५७ वर्ष, धंदा शेती रा. केळवद ता. चिखली यांनी समक्ष पोलीस स्टेशन चिखली येथे हजर येवून रिपोर्ट दिला की, दिनांक ०७/०३/२०२५ रोजी फिर्यादी हे त्यांच्या परिवारासह बाहेरगावी लाखनवाडा येथे गेले व रात्री १०.०० वाजेच्या सुमारास घरी केळवद येथे आले असता, त्यांना त्यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यावेळी त्यांनी घराचे दार उघडून घरात जावून पाहणी केली असता, त्यांना बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले व कपाटाची तिजोरी उघडी दिसून आली. फिर्यादी यांनी तिजोरीची पाहणी केली असता, तिजोरीमध्ये ठेवलेले १) सोन्याची चैन व त्यांमध्ये एकसोन्याचा ओम वजनी अंदाजे १९ ग्रॅम ९९० मिली किंमत अंदाजे १.६२६०० रूपये २) एकसोन्याची फॅन्सी चैन वजनी अंदाजे ७ ग्रॅम ३०० मिली किमत अंदाजे ४९७०० रूपये ३) सोन्याची अंगठी वजनी अंदाजे ७ ग्रॅम ४१० मिली किंमत अंदाजे ५०,७०० रूपये ४) सोन्याचे ओम दोन नग वजनी अंदाजे ५७० मिली किंमत अंदाजे ३९०० रूपये ५) लहान मुलाची सोन्याची अंगठी दोन नग वजनी अंदाजे ८१० ग्रॅम किंमत अंदाजे ५६०० रूपये असा एकूण २,७२,५०० रूपयांचे एकूण सोन्याचे दागिने ३६ ग्रॅम ८० मिली एकूण किंमत २,७२,५०० रूपयांचा मुद्देमाल दिसून आला नाही. याबाबत दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून गुन्हा दाखल करून तपासात घेतला असता सदर गुन्ह्याच्या संबंधाने पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी पोलिस स्टेशनचे डी.बी. पथक यांना गुन्ह्या संदर्भाने सखोल तपास करणे व आरोपी शोधकामी सूचना देण्यात आल्या असता, डी.बी. पथकाचे सहाय्यक फौजदार राजेंद्र काळे, नीलेश सावळे, अजय इटावा यांना गोपनीय माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी हा अण्णाभाऊ साठे चौक येथे येणार आहे. डीबी पथक हे तेथे सापळा रचून थांबले असता, आरोपी सूरज प्रमोद मोरे हा अण्णाभाऊ साठे चौकमधून जाताना दिसून आला. त्यास थांबवून नाव-गाव विचारले असता, त्याने त्यांचे नाव सूरज प्रमोद मोरे असे सांगितले. त्याला त्याचा साथीदार विजय गवईबाबत विचारपूस केली असता, तो घरासमोर असल्याबाबत सांगितले. पोलिस पथकाने सापळा रचून विजय महादू गवई यास ताब्यात घेवून पोलिस स्टेशनला आणून आरोपीस विश्वासात घेवून विचारपूस केली असता, सदरचा गुन्हा केल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यांनी चोरी केलेले दागिने ३६ ग्रॅम ८० मिली वजनाचे एकूण किंमती २,७२,५०० रूपयेचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पो. नि. संग्राम पाटील, डी.बी. पथकाचे परि. पोउपनि समाधान वडने, स. फौ राजेंद्र काळे, पोना अमोल गवई, पंढरीनाथ मिसाळ, प्रशांत धंदर, सागर कोल्हे, नीलेश सावळे, अजय इटावा, राहुल पायघन, मपोकों रुपाली उगले यांनी केली आहे.

Share This Article
Exit mobile version