शेळगाव आटोळ पाणी पुरवठा योजनेचा बंद असलेला पाणीपुरवठा तात्काळ सुरू करा!

admin 3 Min Read
3 Min Read

– डॉ. विकास मिसाळ यांचा सरपंच संतोष बोर्डे आणि ग्रामपंचायत सदस्यांसह पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाचा इशारा
– माजी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी साडेचार कोटींचा निधी देऊनही शेळगाव आटोळवासीयांच्या नशिबी पाणीटंचाई!

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – शेळगाव आटोळ, ता. चिखली या गावाला पाणीपुरवठा करणारी योजना ही मागील एका वर्षापासून बंद असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता, भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर योजनेद्वारे शेळगाव आटोळ गावाचा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा, अन्यथा दिनांक १८ मार्चरोजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, सरपंच संतोष बोर्डे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव देशमुख, कैलास बोर्डे, सौ.मुक्ता देशमुख, सौ. वनिता मिसाळ, सौ. आशा बोर्डे आणि सरपंच संघटना तालुका अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांना निवेदनाद्वारे दिला आहे. याप्रसंगी मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील मिसाळ हेदेखील उपस्थित होते.

सविस्तर असे, की शेळगाव आटोळ, तालुका चिखली या गावाला शेळगाव आटोळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु मागील एका वर्षापासून या योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच खाजगी व्यक्तीकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. सदर योजना दुरुस्तीसह पाण्याचा स्त्रोत वाढविण्यासाठी धरणात २ इंटेक वेल आणि जॅक वेल खोलीकरण करणे इत्यादी कामाकरिता तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ४.५ कोटी रुपये निधी मंजूर करून दिला होता. परंतु जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून किरकोळ दुरूस्ती वगळता पाण्याचा स्त्रोत वाढविण्यासाठी आवश्यक असलेले विहीर खोलीकरण आणि नवीन इंटेक वेलचे काम अजूनही हातात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील एका वर्षापासून बंद असलेला शेळगाव आटोळ गावाचा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा, अन्यथा १८ मार्च २०२५ रोजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद बुलडाणा यांना देण्यात आले आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, शेळगाव आटोळ नगरीचे प्र.सरपंच संतोष बोर्डे, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भुजंगराव देशमुख, कैलास शेषराव बोर्डे, सौ. मुक्ता अनिल देशमुख, सौ. वनिता विकास मिसाळ, सौ. आशा शरद बोर्डे यांच्या सह्या आहेत. निवेदन देतेवेळी मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील मिसाळ हेदेखील उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version