झेडपी, पं.स. निवडणुकांबाबत संभ्रम; तरीही निवडणूकपूर्व मशागतीला जोर!

admin 4 Min Read
4 Min Read

– जनगणनाच झाली नसल्याने नव्याने झालेल्या गट व गणानुसार होणार निवडणूक?; सरपंचपदाचेही आरक्षण लवकरच!
– राज्य निवडणूक आयोगाने लोकसंख्येबाबत मागिवली माहिती!
– जिल्ह्यात ६८ जिल्हा परिषद तर १३६ पंचायत समिती गण; पूर्वी होते ६० जिल्हा परिषद गट!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू असल्याने या निवडणुकांबाबत सध्यातरी संभ्रम आहे. मात्र असे असताना निवडणूकपूर्व तयारीला राजकीय पक्षाकडून जोर असल्याचे दिसून येत आहे. राज्य निवडणूक आयोगानेही लोकसंख्येबाबत अद्ययावत माहिती मागितली आहे. मात्र जनगणनाच झाली नसल्याने लोकसंख्या तेवढीच राहील, परिणामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ही नव्याने झालेल्या गट व गण फेररचनेनुसार होणार असल्याचे समजते. जिल्ह्यात सदर नवीन फेररचनेनुसार जिल्हा परिषदेचे ६८ तर पंचायत समितीचे १३६ गण आहेत. जिल्हा परिषदेचे पूर्वी ६० गट होते. त्यात आठने वाढ झाली आहे. तर पंचायत समितीचेही १६ गण वाढले आहेत. सदर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षणदेखील यापूर्वीच काढण्यात आलेले आहे. पुढील वर्षी मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षणदेखील लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. राजकीय पक्षांसह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची क्रांतीकारी शेतकरी संघटनाही या निवडणुकीच्या चांगलीच कामाला लागली आहे.

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण पाहण्यासाठी येथे क्लीक करा..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. येथे प्रशासकराज सुरू असल्याने जनतेचे कामे होत नाहीत, अशी ओरड सातत्याने सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थां मधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे, यावर आता ६ मेरोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुका कधी होतील, याबाबत मात्र संभ्रम आहे. असे असले तरी निवडणूक होईल व आपल्याला लढायचेच, अशी खूणगाठ बांधत अनेकांनी तयारीदेखील सुरू केली आहे. तर काहींच्या या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्याही सुरू झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १० मे २०२२ च्या आदेशान्वये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची फेररचना करण्याचे सांगितले होते. त्यावरून तत्कालीन जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी गट व गणांची फेररचना करून २७ जून २०२२ रोजी याबाबत महाराष्ट्र शासनाचे राजपत्रदेखील प्रसिद्ध करण्यात आले होते व पुढील निवडणुका यानुसार होतील, असेही या राजपत्र म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून नुकतीच जिल्ह्यातील लोकसंख्येबाबत माहिती मागविण्यात आली असून, सदर माहिती जिल्हाधिकारी कार्याकडून पाठवण्यातसुद्धा आल्याची माहिती आहे. परंतु, २०११ नंतर जनगणनाच झाली नसल्याने लोकसंख्येत वाढ होणारच नाही. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ठरलेल्या फेररचनेनुसार होणार आहे, असे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे.

नवीन फेररचनेनुसार जिल्हा परिषद गटांची संख्या ६० वरून ६८ झाली आहे तर पंचायत समिती गणांची संख्या १३६ झाली आहे. यामध्ये झेडपीचे ८ गट तर पं.स.चे १६ गण वाढले आहेत. नवीन फेरचनेनुसार जळगाव जामोद तालुक्यातील जामोद, वडशिंगी आसलगाव, पिंपळगाव काळे, संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, बावनबीर, पळशी झाशी, पातुर्डा बुद्रुक, शेगाव तालुक्यातील आळसना, माटरगाव बुद्रुक, व चिंचोली, नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा, निमगाव, दहिवडी, वडनेर भोलजी, टाकरखेड, मलकापूर तालुक्यातील देवधाबा, मलकापूर ग्रामीण, दाताळा, मोताळा तालुक्यातील तळणी, कोथळी, धामणगाव बढे, रोहिणखेड, तरोडा, खामगाव तालुक्यातील सटाळा बुद्रुक, घाटपुरी, पळशी बुद्रुक, अंत्रज, पिंपळगावराजा, कुंबेफळ, अटाळी, लाखनवाडा बुद्रुक, मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा, शेलगाव देशमुख, जानेफळ, कळंबेश्वर, देऊळगाव माळी, डोणगाव, उकळी, अंत्री देशमुख, चिखली तालुक्यातील उंद्री, ईसोली, अमडापूर, शेलुद, सवणा, भोगवती, आंचरवाडी, मेरा बुद्रुक, बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट, सावळा, साखळी बुद्रुक, ढालसावंगी, मासरूळ, धाड, रायपूर, देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही, सिनगाव जहागीर, सावखेड भोई, सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, शेंदुर्जन, किनगांवराजा,सोनोशी, लोणार तालुक्यातील सुलतानपूर, वढव, किनगावजट्टू व पांग्रा डोळे जिल्हा परिषद गटाचा समावेश आहे.

अनेक हवश्यानवश्यांनाही लागले निवडणुकीचे वेध

ज्यांना गावात काळंकुत्रही विचारत नाही, अशांनाही जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध लागले आहेत. तर काहींना त्यांच्या मित्रवर्ग, कार्यकर्त्यांनी घोड्यावर बसवणे चालवले असून, भाऊ, दादा, युवा नेता म्हणून निवडणुकीला उभे राहण्यासाठी शिडात हवा भरली जात आहे.

Share This Article
Exit mobile version