– अज्ञात व्यक्तींचे कृत्य, अंढेरा पोलिसांत गुन्हे दाखल
– ठाणेदार रूपेश शक्करगे यांच्याकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न!
चिखली (प्रताप मोरे) – तालुक्यातील दोन गावांत रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसविण्यात आले, तर शेळगाव आटोळ येथे भगवा झेंडा रोडच्या मधोमध उभारण्यात आला. या घटनांमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता पाहाता, अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रूपेश शक्करगे यांनी तात्काळ दखल घेवून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या घटना मनुबाई, सुरा, आणि शेळगाव आटोळ येथे उघडकीस आल्या आहेत. दरम्यान, ठाणेदार रूपेश शक्करगे यांनी तीनही गावांतील ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी, ग्रामस्थांनी शिवरायांचे पुतळे व झेंडा हटविण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. या घटनांमुळे कुठेही तणाव वैगरे दिसून आलेला नाही. दरम्यान, शेळगाव आटोळ येथे चौकात लावलेला भगवा झेंडा काढण्याच्या प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्यानंतर हा झेंडा काढू देणार नाही, अशी भूमिका गावातील तरूणवर्गाने घेतली आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या मनुबाई आणि सुरा या गावात पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे नव्हते. त्यामुळे शिवजयंती दिनाचे औचित्य साधून शिवप्रेमी यांनी रातोरात निर्णय घेवून पुतळे शिवरायांचे पुतळे बसविले. मात्र या घटनेची गुपित माहिती अंढेरा ठाणेदार यांना मिळाली असता, त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेवून गावाकर्यांची बैठक घेतली आणि विचारणा केली की पुतळा बसवण्यासाठी परवानगी का घेतली नाही? विनापरवानंगीविना पुतळे बसविणे हा मोठा गुन्हा आहे. अशा घटनेमुळे गावात तणाव वाढला तर याला जबाबदार कोण असेल? त्यामुळे आपण बसविलेले पुतळे काढून घेण्यात यावे आणि रीतसर प्रशासनाकडे अर्ज करून पुतळा बसवावा, असे म्हणताच शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण पसरले. मात्र ठाणेदार यांनी सर्वांना समजावून सांगितले पण शिवप्रेमीनी पुतळा काढला नसल्याने ठाणेदार यांनी ग्रामसेवक यांच्या लेखी जबाबावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर शेळगाव आटोळ येथे अज्ञात व्यक्तीने रातोरात रोडच्या मध्यभागी दोन बाय तीन असा खड्डा खोदून त्यात सिमेंट गिट्टी टाकून लोखंडी पाईपवर भगवा झेंडा उभारला. या घटनेची माहिती ठाणेदार यांना मिळताच त्वरित घटनास्थळी जावून गावातील पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक तथा गावातील प्रतिष्ठीत व शिवप्रेमी यांना बोलावून झेंडा काढून घ्यावा, अशा सूचना दिल्या असता, गावाकर्यांनी सांगितले की पहिल्यांदा गावातील अतिक्रमण काढू, त्या वेळेस झेंडा पण काढून घेवू, तोपर्यंत काढणार नाही. परंतु उभारलेला झेंडा हा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत नसून, तो सार्वजनिक बाधकाम विभागाच्या हद्दीत आहे. त्यामुळे झेंडा काढून घेण्याची जबाबदारी ही त्या संबंधित विभागाची आहे, असे सांगितल्याने ठाणेदार यांनी ग्रामसेवक यांना लवकरात निर्णय घेवून झेंडा काढून घ्यावा, जेणे करून गावात तणाव होणार नाही, यांची काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या. या घटनांचा पुढील तपास अंढेरा पोलिस करत आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांसह शेळगाव आटोळ येथे भगवा झेंडा उभारण्यात आल्याने कोण्याही गावात तणाव वैगरे नव्हता. सर्व ग्रामस्थांनी या प्रकाराला पाठिंबा दिला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र शांतता असल्याचे दिसून आले आहे.

