अजिंक्य भारत! टीम इंडियाने १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली!!

admin 2 Min Read
2 Min Read

– न्यूझीलंडला ४ विकेट्सने धूळ चारली; रोहितच्या नेतृत्वात ९ महिन्यांत दुसरे आयसीसी जेतेपद!
– भारतात विजयाचा जल्लोष; अक्षरशः दिवाळी साजरी!

दुबई (प्रतिनिधी) – भारतीय संघाने सलग दुसर्‍यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकून देशवासीयांची मान गर्वाने उंचावली. दुबई येथे खेळल्या गेलेल्या आजच्या चित्तथरारक सामन्यात टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने धूळ चारून तिसर्‍यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुबईत खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अपराजित राहिला आणि चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. या विजयाने भारतात अक्षरशः दिवाळी साजरी होत आहे.

न्यूझीलंडने दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ४९ षटकांत ६ गडी गमावून २५४ धावा करून विजय मिळवला. भारताने ९ महिन्यांपूर्वी आयसीसी टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हाही रोहित कर्णधार होता. रोहित आणि विराटसाठी ही चौथी आयसीसी ट्रॉफी आहे. अंतिम सामन्यात रोहित शर्माने तुफानी सुरुवात करून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. यापूर्वी, भारताने २००२ मध्ये श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली होती, तर २०१३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही ट्रॉफी जिंकली होती. कर्णधार म्हणून रोहित शर्माचे हे ९ महिन्यांत दुसरे आयसीसी जेतेपद आहे. गेल्या वर्षी २९ जूनरोजी त्याने टी-२० विश्वचषकही जिंकला होता. रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी करत ७६ धावा केल्या. श्रेयस (४८ धावा), केएल राहुल (नाबाद ३४ धावा) आणि अक्षर पटेल (२९ धावा) यांनी धावांचा पाठलाग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वात मोठी भूमिका बजावली, कारण त्याने सलग दोन षटकांत दोन बळी घेत, सामना भारताच्या बाजूने झुकवला. त्याने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल (६३ धावा) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

Share This Article
Exit mobile version