दर महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी तहसील कार्यालयात लोकशाही दिन

admin 2 Min Read
2 Min Read

– चिखली तहसीलदार संतोष काकडे यांची माहिती
– विहित नमुन्यातच अर्ज स्वीकारले जाणार, १५ दिवसआधी अर्ज देणे आवश्यक
– सोमवारी, दि. १७ मार्चरोजी चिखली तहसील येथे लोकशाही दिन

चिखली (महेंद्र हिवाळे) – राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याचे तिसर्‍या सोमवारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने चिखली तहसील कार्यालय येथे तालुकास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. १७ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली आहे. लोकशाही दिनासाठी अर्जदारांनी अर्ज विहीत नमुन्यात १५ दिवसआधी दोन प्रतीत पाठवणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्जच स्विकारण्यात येणार आहेत.

याबाबत तहसीलदार संतोष काकडे यांनी सांगितले, की शासन परिपत्रक क्रमांक प्रसुधा २०११ / प्र.क्र.१८९/११/१८ – अ दिनांक २६ सप्टेंबर २०१२ अन्वये सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून ‘लोकशाही दिन’ हा तालुकास्तरावरदेखील राबविण्यात यावा, ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. लोकशाही दिनाच्या कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे एकत्रित मार्गदर्शक तत्वे विहीत करण्यात आलेली आहेत. तालुकास्तरावर लोकशाही दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष हे तहसीदार आहेत. अर्जदार यांनी (नमुना प्रपत्र १) विहीत नमुन्यात अर्ज द्यावा, प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सर्व स्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृत केल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे, त्या विभागाच्या विभागप्रमुखांकडे संबंधित अर्ज पाठविण्यात येवून अर्जातील विनंतीबाबत केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह तहसील कार्यालय चिखली येथे प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या सोमवारला सकाळी १०.०० वाजता लोकशाही दिन घेतला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस ‘लोकशाही दिन’ म्हणून पाळण्यात येतो. लोकशाहीदिनी हजर राहून सदर अहवाल, अर्जदाराची विनंती, त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका, तरतुदी याबाबींचा विचार करून ‘लोकशाही दिन’प्रमुख निर्णय देतात. सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी या न्याय तत्परतेने निकाली काढण्यासाठी अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. विहीत नमुन्यातील अर्जच स्वीकारण्यात येतील, असे चिखली तहसीलदार संतोष काकडे यांनी कळवले आहे.

Share This Article
Exit mobile version