वाळूतस्करांना आणखी एक दणका, दोन टिप्पर जप्त!

admin 3 Min Read
3 Min Read

– सिंदखेडराजा तालुक्यात महसूल विभागाची चार दिवसांत चौथी कारवाई
– तालुक्यातील नदीपात्रांतून वाळूतस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले
– सिंदखेडराजा नायब तहसीलदार व पथकाची मध्यरात्री धडक कारवाई

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील अवैध रेती उत्खननाचे माहेरघर ठरलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातून अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणार्‍यांना ब्रेकिंग महाराष्ट्रच्या वृत्तानंतर महसूल विभागाने दणके देणे सुरूच ठेवले असून, महसूल विभागाने चार दिवसांत चार कारवाया करीत रेतीतस्करांत चांगलीच दहशत निर्माण केली आहे. उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे व तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज प्रतिबंध पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार डॉ.प्रवीणकुमार वराडे व त्यांच्या पथकाने काल (दि.५) मध्यरात्री व आज (दि.६) सकाळी दोन ब्रास अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडून किनगावराजा व सिंदखेडराजा पोलिस स्टेशनमध्ये अटकाव करण्यात आले आहेत.

सविस्तर असे, की काल रात्री ११:४० वाजेदरम्यान तहसीलदार अजित दिवटे यांच्या आदेशानुसार अवैध गौण खनिज वाहतूक प्रतिबंध पथकाने तढेगाव फाटा येथे अंदाजे दोन ब्रास रेतीसह टिप्पर पकडून पोलिस ठाणे किनगावराजा येथे जमा केले. तर आज सकाळी ०५:५५ वाजेच्या सुमारास सोनोशी शिवारामध्ये अवैध गौण खनिज वाहतूक करणारे अंदाजे दोन ब्रास रेतीसह पिवळ्या रंगाचे टिप्पर पकडून पोलिस ठाणे सिंदखेडराजा येथे जमा करण्यात आले. सदर कार्यवाही पथक प्रमुख नायब तहसीलदार डॉ.प्रवीणकुमार वराडे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमंत पांडव, श्री दराडे, श्री चव्हाण व महसूल सेवक संजय आटोळे यांच्या पथकाने केली. वरील टिप्पर हे सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन व वाहतूक करताना पकडले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागाला जाग आली आणि खुद्द उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे व तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री सिंदखेडराजा तालुक्यात खडकपूर्णा नदीपात्राजवळील गावांमध्ये अवैध गौण खनिज प्रतिबंध पथक प्रमुख नायब तहसीलदार डॉ.प्रवीणकुमार वराडे व त्यांच्या पथकाने भेट दिली असता, तढेगाव फाटा येथे अंदाजे दोन ब्रास रेतीसह टिप्पर पकडून सदर टिप्पर चालकांना वाहतूक परवाना विचारला असता, त्यांच्याकडे परवाना नसल्याने सदर वाहन किनगावराजा येथे अटकाव करण्यात आले, तर सकाळी सोनोशी शिवारामध्ये दोन ब्रास रेती वाहतूक करताना टिप्पर पकडून असता त्यांच्या कोणताही परवाना आढळून आला नाही. यामुळे सदर वाहनाचा पंचनामा करून हे वाहन सिंदखेडराजा येथील पोलिस स्टेशन मध्ये अटकाव करण्यात आले आहे. तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख नायब तहसीलदार डॉ.प्रवीणकुमार वराडे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमंत पांडव, श्री दराडे, श्री चव्हाण व महसूल सेवक संजय आटोळे यांचे पथकाने केली.

Share This Article
Exit mobile version