कलेच्या सादरीकरणातून लोकसंस्कृती प्रवाहित होते – प्रा. गजेंद्र गवई

admin 3 Min Read
3 Min Read

– मौजे डोढरा येथे ‘कलावंत जोडो अभियानां’तर्गत कलावंत सभा उत्साहात

चिखली (प्रताप मोरे) – पारंपरिक विविध लोककलेच्या प्रभावी सादरीकरणातून कलाकारांचे अस्तित्व व कौशल्य विकसित होऊन कला प्रवाहित होत राहते. त्यासाठी तमाम लोक कलावंतांनी ‘लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्य ‘या राज्यव्यापी शिखर संघटनेचे सभासदत्व स्वीकारून प्रवाहात यावे, असे मत प्रा.गजेंद्र गवई यांनी व्यक्त केले. मौजे डोढरा (ता.देऊळगावराजा) येथे आयोजित कलावंत सभेत ते बोलत होते. लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने व स्थानिक कलावंत यांच्या पुढाकाराने कलावंत जोडो अभियानअंतर्गत पंचशील बुद्धविहाराच्या सभागृहात कलावंत जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र साळवे होते तर प्रमुख मार्गदर्शक लोप्रपचे राज्य समन्वयक तथा कोषाध्यक्ष प्रा. गजेंद्र गवई, प्रवर्तक तेजरावबापू देशमुख, कौतिकराव देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवाच्या प्रतिमाचे पूजन करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. शाहीर संजय वाकोडे यांनी स्वागत गीत गायले तर मान्यवरांचे गावाकर्‍यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात तेजराव देशमुख यांनी लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना, उद्देश, ध्येय विषद करून प्रत्येक गावातील उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित कलाकार, वादक, गायक यांना संघटीत करून लोकलढा उभारणी करण्याचे जाहीर केले तर मुख्य मार्गदर्शक प्रा. गजेंद्र गवई यांनी कला व कलाकार यांचे अस्तित्व, शासन दरबारी असणारी उदासिनता, उपेक्षा, संधी, मानधन योजना, शासकीय कार्यक्रम, प्रबोधन व परिवर्तनाची आवश्यकता याची माहिती देऊन उपस्थित कलावंत यांना अस्तित्वाची जाणीव करून दिली. प्रत्येक गावागावात असणार्‍या सर्व प्रकारच्या कलावंताचे ग्रामपंचायत स्तरावर सर्व्हे करून नोंद व्हावी, त्यांना शासनाने ओळखपत्र देऊन विविध योजनाच्या लाभासाठी विशिष्ट आरक्षण द्यावे, असे मत व्यक्त केले. प्रवर्तक कौतिकराव देशमुख यांनीसुद्धा याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शाहीर संजय वाकोडे यांनी केले तर कवी गायक सुभाष वाकोडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पी टी वाकोडे, सी टी घेवंदे, दिनकर साळवे, सुरेंद्र साळवे, कवी गायक सुभाष वाकोडे, महिंद्र साळवे, ज्ञानेश्वर वाकोडे, भास्कर साळवे, डिगांबर वाकोडे, राजू वायाळ, सुधाकर शिंदे, प्रकाश वाकोडे, शिवाजी साळवे, परमेश्वर वाकोडे, जगदेव वाकोडे, गायिका विद्या साळवे, सुनिता वाकोडे, आशाबाई साळवे, मालता मोरे, मंदाबाई सुरडकर, सुमनबाई साळवे, सुनिता साळवे, पुष्पा वाकोडे, कमल वाकोडे, कु. आदिती साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version