स्व. संतोष देशमुख नृशंस हत्याकांडाच्या निषेधार्थ देऊळगावराजा कडकडीत बंद!

admin 2 Min Read
2 Min Read

– क्रूरकर्मा वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन
– वाल्मिक कराडच्या प्रतिमेला मारले जोडे!

देऊळगावराजा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोषबापू देशमुख यांच्या अतिशय नृशंस हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि या हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज (ता.५) देऊळगावराजा शहरात सर्व समाजाच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच, यावेळी संतप्त जमावाने वाल्मिक कराडच्या प्रतिमेला जोडे मारून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

सरपंच संतोषबापू देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाच्या निषेधार्थ सर्व समाजाच्यावतीने बंदची हाक देण्यात आली होती. तिला प्रतिसाद देत शहरातील सर्वच व्यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद ठेवून स्व. देशमुख हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीला आपले समर्थन दिले. आज पहाटेपासूनच उघडणारी दुकाने बंद ठेवण्यात आली. सकाळी दहा वाजेनंतर शहरातून निघालेल्या दुचाकी रॅलीत सर्वधर्म समाज बांधवांनी सहभाग घेऊन व्यवसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी बसस्थानक चौकात दुचाकी रॅली पोहोचल्यावर मान्यवरांनी संतप्त भावना व्यक्त करीत, स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे आरोपीना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करीत आंदोलनकर्त्यांनी वाल्मिक कराडच्या प्रतिमेला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला.

यावेळी प्रा.दिलीपकुमार झोटे, दीपक बोरकर, गणेश सवडे, श्रीनिवास खेडेकर, राजेश इंगळे, गंगाधर जाधव, अनिल चित्ते, हनिफ शाह, डॉ.निखिल शिंदे, डॉ.विशाल शिंदे, विष्णू रामाणे, विनायक पाटील भानुसे, अर्पित मिनासे आदींनी दोन दिवसापूर्वी स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील व्हायरल झालेली छायाचित्रे आणि व्हिडीओमधील क्रूरता पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही, अशा तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी प्राचार्य विठ्ठलराव टेकाळे, रंगनाथ कोल्हे, नंदन खेडेकर, कविश जिंतूरकर, पवन झोरे, संतोष राजेजाधव, अतिश खराट, दीपक पवार, अभिनव खांडेभराड, नीतेश देशमुख, बद्रीनाथ शिंदे, अरविंद खांडेभराड, बंडू डोळस, बंडू म्हस्के, रामेश्वर वायाळ, रफिक पठाण, शौकत हुसेन, अशोक शेळके, संजय सवडे, अमोल जाधव, अ‍ॅड.अतिश खरात, सुखदेव बुरकूल, विठ्ठल खरात आदींची उपस्थिती होती. आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

Share This Article
Exit mobile version