धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ, प्रकाश सोळंकी, की मनोज कायंदेंना अजितदादांकडून मंत्रिपदी संधी?

admin 4 Min Read
4 Min Read

– धनंजय मुंडेचा राजीनामा झाल्याने अजितदादांकडून ओबीसी चेहर्‍याचीच मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता?
– आ. सुरेश धसांनीही दिले होते मनोज कायंदे यांच्या नावाचे संकेत!
– अजित पवार आता छगन भुजबळ की प्रकाश सोळंकी? कुणाची नाराजी दूर करणार?

मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुंडे यांच्या जागेवर नाराज असलेले छगन भुजबळ यांना संधी देऊन त्यांची नाराजी दूर करणार का? की दुसरे नाराज असलेले ज्येष्ठ नेते तथा तब्बल पाचवेळा माजलगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार प्रकाश सोळंकी यांना मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर करणार? की, वंजारी चेहरा म्हणून तरूण आमदार मनोज कायंदे यांना संधी देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाला मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी मागणी सर्वस्तरातून पुढे आली आहे. दुसरीकडे, आ. सुरेश धस यांनीदेखील मनोज कायंदे यांच्या मंत्रिपदाचे संकेत दिले होते. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे राजकारण संपवायचे असेल तर मनोज कायंदे यांना मंत्रिपदाची संधी देऊन ताकद द्यावी, अशी मागणीही अजितदादांच्या पक्षस्तरातून पुढे आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या नृशंस हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या अटकेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविला आहे. विशेष म्हणजे, राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव निर्माण करावा लागला होता. विरोधी पक्षाने विधीमंडळाचे कामकाजदेखील बंद पाडले होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांच्या मंत्रिमंडळात समावेशाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, ते ओबीसी समाजातील वंजारी जातीचे असून, धनंजय मुंडेही वंजारी असल्याने या चर्चेला पुष्टी मिळू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडा ओबीसी चेहरा असलेले छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिले नसल्याने ते अगोदरच नाराज आहेत. त्यामुळे अजितदादा त्यांचीही नाराजी दूर करण्यासाठी मुंडेंच्या जागी भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लावू शकतात. दुसरीकडे, भुजबळ यांच्या नावाला विरोध झाला तर मात्र ओबीसी नेतृत्व म्हणून मनोज कायंदे यांना मंत्रिमंडळात वर्णी लागणे निश्चित मानले जात आहे. मनोज कायंदे यांनी विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेते तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व शिंदे गटाचे नेते डॉ. शशिकांत खेडेकर या दिग्गजांचा धक्कादायक पराभव केला होता. त्यामुळे मनोज कायंदे यांची ‘जायंट किलर’ अशी छबी निर्माण झाली आहे. तसेच, राज्यात वंजारी समाज मोठा असल्याने, व धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याने हा समाज नाराज होण्याची भीती पाहता, मुंडेंच्या जागेवर मनोज कायंदे यांचाच विचार अजितदादा निश्चित करतील, असा राजकीय धुरिणांचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मनोज कायंदे या तरण्याबांड पोराला मंत्री करा, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी यापूर्वीच केलेली आहे. मनोज कायंदे प्रथमच आमदार असल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देणे शक्य नसले तरी, त्यांना राज्यमंत्रिपद मिळणे निश्चित असल्याचेही राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून अजितदादांचे शिलेदार प्रकाश सोळंकी यांनी दमदार विजय मिळवला होता. पाचवर्षांपूर्वी मंत्रिपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असतानाही त्यांना संधी नाकारली गेली होती. आतादेखील त्यांना मंत्रिपदातून डावलले गेल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. सलग पाचव्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रकाश सोळंकी यांना आता मंत्रिपदाची संधी देऊन, त्यांच्यावरील अन्याय अजितदादा पवार दूर करणार का? याकडे आता आ. सोळंकी समर्थकांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे, २०१९मध्ये मंत्रिपदाचा पत्ता कट झाल्याने नाराज झालेले प्रकाश सोळंकी यांनी थेट विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. परंतु, तेव्हा अजित पवार, जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ते अजितदादांसोबत आले आहेत. त्यामुळे त्यांनाच मंत्रिपदी संधी देऊन, अजित पवार हे त्यांची नाराजी दूर करतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
————

देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला!

Share This Article
Exit mobile version