अखेर धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा!

admin 6 Min Read
6 Min Read

– राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे; त्यांना मंत्रिपदातून कार्यमुक्त केले आहे – मुख्यमंत्री फडणवीस
– संतोष देशमुख नृशंस हत्याकांडाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट!

मुंबई (खास प्रतिनिधी) – मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अतिशय क्रूर व निर्घृण हत्याकांडप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. सोमवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी यांनी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. ”धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. मुंडे त्यांचा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविला आहे. त्यांना मंत्रिपदाच्या कार्यभारातून मुक्त केले आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना तूर्त सहआरोपी केले जाणार नाही, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.  चार्जशीटमध्ये त्यांच्याविरोधात कुठलाही थेट पुरावा नाही. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कुठलीही कार्यवाही नाही. राजीनामा दिल्यानंतर आता धनंजय मुंडेंबाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष असणार आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बीड जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे आज बीड शहरातील दुकाने, कार्यालये बंद आहेत. बीडमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.

विविध भ्रष्टाचार प्रकरणात आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या स्पष्टीकरणाबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे समाधानी नव्हते. त्यानंतर मुंडे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील, असा दावा त्यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनी केला होता. मात्र, मुंडेंनी राजीनामा न दिल्याने त्यांचा दावा फोल ठरला होता. त्यानंतर करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून, तो दोन तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असा नवा दावा केला होता. अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सोमवार सायंकाळपासूनच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली होती. यासंदर्भात रात्री उशिरा मुंबईत अजित पवारांच्या बंगल्यावर स्वतः जात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत गोपनीय बैठक घेतली. या बैठकीमध्ये फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितले होते. अजित पवार आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये मुंडेंच्या राजीनाम्यावर एकमत झाले होते. फडणवीस यांनी याच बैठकीत धनंजय मुंडेंना स्पष्ट शब्दांमध्ये ‘राजीनामा द्या’ असे सांगितले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावरून सातत्याने धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर टीका होत होती. धनंजय मुंडेंनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला पाठबळ दिले, आणि या कराडच्याच इशार्‍यानेच हे निर्घृण हत्याकांड झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील अनेक पुरावे समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात होती.

राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आरोपीचं समर्थन करणारी टोळी – धनंजय देशमुख

अडीच महिन्यात जिल्ह्याचे, गावाचे, समाजाचे नुकसान झालंय ते कोण भरून देणार, ज्या गोष्टी चुकीच्या घडल्यात त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्‍यांनी घेतली पाहिजे असं सांगत आरोपीचं समर्थन करणारी टोळी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यानंतर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले, अशातच देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आले आहेत. अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या केल्याचं चित्र या फोटोंच्या माध्यमातून पुढे आलंय. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गुन्हे अन्वेषण विभाग (CID) या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात हे फोटो जोडण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. तर कोणी त्यांच्या शरीरावर पाय ठेवून फोटो काढला आहे. क्रूरतेची सीमा म्हणजे, या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना मारहाण करत हसताना दिसत आहेत. फोटोमध्ये देशमुख यांचा चेहरा पूर्ण सुजलेला दिसत असून हे फोटो समोर आल्यानंतर विविध पातळीवर लोकांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला. अनेकांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरून आपला संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते.

मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली, माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले,”हे भयंकर कृत्य आहे. आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत लढावं लागणार आहे.” 

Share This Article
Exit mobile version