हिवरखेडपूर्णा येथे महसूल प्रशासनाने पकडले वाळूतस्करी करणारे ट्रॅक्टर!

admin 2 Min Read
2 Min Read

– अवैध वाळू वाहतूक सुरूच; एका ट्रॅक्टरवर कारवाई, बाकीच्या ६० ते ६५ टिप्परवर कारवाई कधी?

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील अवैध रेती उत्खननाचे माहेरघर असलेल्या हिवरखेडपूर्णा येथील अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर हिवरखेडपूर्णाचे तलाठी पवार यांनी आज (दि. २ मार्च) दुपारी २ वाजता अवैध रेती वाहतूक करताना पकडून किनगावराजा पोलिस स्टेशनमध्ये अटकाव केले आहे. तथापि, येथील वाळूतस्करी सुरूच असल्याने महसूल प्रशासन वाळूतस्करांचा बिमोड कधी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सविस्तर असे, की सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पवार यांनी रविवारी दुपारी २ वाजेदरम्यान हिवरखेडपूर्णा येथील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक करताना एक ट्रॅक्टर हिवरखेडपूर्णा बसस्थानकाजवळ पकडले असून, सदर वाहन चालकाला रेती वाहतूक परवाना विचारला असता, त्यांच्याकडे वाहतूक परवाना आढळून आला नाही, यावरून ही अवैध रेती वाहतूक असल्याचे सिद्ध झाले असल्याने सदर तलाठी यांनी ही माहिती तहसीलदार अजित दिवटे यांना दिली. त्यावरून तहसीलदार यांनी तहसीलची गाडी व कोतवाल आकाश मघाडे यांना पाठवून सदर ट्रॅक्टरचा पंचनामा करून हे वाहन किनगावराजा पोलिस स्टेशनमध्ये अटकाव करण्यात आले.


या ट्रॅक्टरवर कारवाई केली असली तरी हिवरखेडपूर्णा येथील १५ ते २० टिप्पर अवैध रेती वाहतूक करताना या तलाठ्यांना दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिंदखेडराजा मतदारसंघातील खडकपूर्णा जलाशयातून ६० ते ६५ बोटीद्वारे अवैध रेती उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे व सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असताना, कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे हे अवैध रेती उत्खनन व वाहतूक बंद करण्यात यशस्वी का होत नाही? तसेच या अवैध रेती वाहतूक मागचा मुख्य ‘आका’ कोण? हा प्रश्न सिंदखेडराजा मतदारसंघातील जनतेला पडला आहे.

Share This Article
Exit mobile version