– इसरूळ-शेळगाव आटोळ रस्ता डांबरीकरणाला अखेर सुरूवात; डॉ. विकास मिसाळ यांच्या नेतृत्वातील तीन गावांच्या सरपंचांच्या अन्नत्याग आंदोलनाचा परिणाम!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – शेळगाव आटोळ ते इसरूळ-बायगाव रस्ता डांबरीकरणाला अखेर सुरूवात झाली असून, देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ या रस्ताकामाचा वेगही सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढविला आहे. परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी इसरूळ, शेळगाव आटोळ, मिसाळवाडीच्या सरपंचांसह केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला निर्णायक यश आले आहे. दरम्यान, डांबरीकरणाचे काम सुरू केल्यानंतर या मार्गाने चालणार्या अवैध रेतीवाहतूकदारांना इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी निर्णायक इशारा दिला आहे. डांबरीकरण सुरू आहे, थांबून घ्या, नाही तर एकदम ओक्के कार्यक्रम करू, असा इशारादेखील सतिश पाटलांनी वाळूतस्करांना दिला आहे.
इसरूळ येथे पोलिस चौकी ठरली निव्वळ दिखावा!
इसरूळ येथून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असल्याने सरपंच तथा दक्षता समितीचे अध्यक्ष सतिश पाटील भुतेकर यांनी अवैध वाळू वाहतूक करणार्या टिप्परवर कारवाईसाठी आरटीओ, महसूल व पोलिस प्रशासनाला वारंवार कळवले होते. तरीदेखील काहीच कारवाई होत नसल्याने सरपंच सतिश पाटील भुतेकर हे स्वतः रस्त्यावर उतरले व वाळूतस्करांवर कारवाई केली. याच कारवाईदरम्यान वाळूतस्कराने डॉ. विकास मिसाळ यांच्या अंगावर टिप्पर घालून त्यांना चिरडण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर इसरूळ येथे पोलिस चौकी टाकण्यात आली आहे. परंतु, ही पोलिस चौकी निव्वळ दिखावा ठरली आहे. रात्री दहा ते सहा वाजेपर्यंत वाळूतस्कर विनानंबरच्या टिप्परसह अवैध वाळू वाहतूक करत असून, रात्री दहा वाजेनंतर या पोलिस चौकीत कुणीच हजर नसते. त्यामुळे या चौकीचा असून, नसून काहीच फायदा नाही. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत या पोलिस चौकीत कर्मचारी देण्यात यावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.

