– तहसीलदारांच्या आश्वासनानंतरही ग्रामस्थ आक्रमक; जलसमाधी आंदोलन मागे, तरी धरणे आंदोलन सुरूच! – पाझर तलावाच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा आता निर्णायक लढा!
नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरूस्ती करून साठवण क्षमता वाढवून, सिमेंटची भिंत बांधून, उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची सुविधा करावी या प्रमुख मागणीसाठी गोळेगाव ग्रामस्थांनी सोमवार (दि.२४) तारखेपासून येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून, आंदोलनाचा चौथा दिवस उलटूनदेखील प्रशासनाच्या अधिकार्यांनी या आंदोलनाची दखल न घेतल्याने ग्रामस्थ संतापले. त्यामुळे, आज शुक्रवारी पाझर तलावात शेकडो शेतकर्यांनी उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनाची एकच धांदल उडाली. घटनास्थळी तातडीने येऊन तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी आंदोलकांची भेट घेतली योग्य त्या कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन स्थगित केले असले तरी धरणे आंदोलन मात्र सुरूच ठेवले आहे. पाणीप्रश्नी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले आहेत.
गोळेगाव तलावाची उंची वाढविण्यात यावी, तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शेतकर्यांना अनुदानीत विहिरी मिळण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या यादीत गोळेगावचा समावेश करावा. येथील शेतकर्यांना विहिरीचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी गोळेगाव येथील ग्रामस्थ दहा वर्षांपासून प्रशासनाकडे तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहेत. वेळोवेळी मागणी करूनही अद्यापही हा प्रश्न मार्गी न लागल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दि. २४ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन पुकारले गेले असून, हा तलावाचा प्रश्न मार्गी न लागल्यास पाझर तलावात जलसमाधी घेणार असल्याचे झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे यांनी दोन दिवसापूर्वी प्रशासनाला इशारा दिला होता. प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी आज तलावात उड्या मारल्याने प्रशासनची एकच धांदल उडाली. सुमारे पाच तास ग्रामस्थ तलावातील पाण्यात होते. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रशांत सांगडे, शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, जलसंपदा विभागाचे उपअभियंता रुपनर, ग्रामसेवक उद्धव जाधोर यांनी आंदोलकांची भेट घेवून चर्चा केली. आपल्या भावना वरिष्ठांकडे कळवून हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिल्यानंतर पुकारलेले जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. हा ्मोठा पाझर तलाव असू, त्याची निर्मिती सन १९७२ ला झालेली आहे. डोंगर भागातील वाहून येणार्या पाण्याच्या तुलनेने तलावाची भिंत व पाणी साठवण क्षमता अत्यंत कमी आहे. तलावात साठवण होत असलेल्या पाण्याच्या दहापट पाणी सांडव्याद्वारे वाहून जाते. या तलावाची दुरुस्ती अथवा मातीच्या भितीऐवजी सिमेंटची भिंत केली तर त्या ठिकाणी मोठा पाणीसाठा उपलब्ध होऊन गोळेगावसह परिसरातील लाडजळगाव, शेकटे, बोधेगाव, दिवटे, हातगाव, बालमटाकळी आदी गावांना भविष्यात शेतीसाठी व पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. या आंदोलनात संजय आंधळे, भुजंग आंधळे, नवनाथ फुंदे, बुवासाहेब फुंदे, अमोल वावरे, संदीप फुंदे, शंकर फुंदे, नवनाथ रासनकर, सचिन फुंदे, अजिनाथ आंधळे, केशव बडे, नवनाथ बर्डे, महादेव बडे, अर्जुन आंधळे, रामराव सानप, असलम शेख, बंडू आंधळे, बबन पवार, अनिल फुंदे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. तर बेमुदत धरणे आंदोलनात ग्रामस्थ, गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत.
डोंगर परिसरातील गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती व पाणी साठवण क्षमता वाढली तर हा मिनी भंडारदरा होवू शकतो, यापूर्वी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, विजय शिवतारे, राम शिदे यांच्याकडे पाठपुरावा करूनदेखील हे काम राजकीय श्रेयवादात मागे पडले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने गोळेगावचा समावेश शोषितऐवजी अंशतः शोषितमध्ये केला असून, हे चुकीचे सर्वेक्षण केलेले आहे. या विभागाने गावांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता कार्यालयातच कागदे काळे केली असल्याचा आरोप संजय आंधळे, अध्यक्ष झाड फाउंडेशन यांनी केला आहे. —- गोळेगाव येथील पाझर तलाव दुरुस्तीसंदर्भात तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी या योजनेच्या भूजल सर्वेक्षण संबंधित गोळेगाव येथील ग्रामस्थांचे बेमुदत धरणे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू आहे. यासंदर्भात शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना केल्या. लवकरच संबंधित विषय गटविकास अधिकारी यांच्यामार्फत संबंधित कार्यालयाच्या अधिकार्यांना कळविण्यात येणार आहे. – प्रशांत सांगडे, तहसीलदार शेवगाव