बुलढाण्याच्या भूमिपुत्र अधिकार्‍याचा राज्यात डंका; आयएएस विशाल नरवाडे ठरले सर्वोत्कृष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी!

admin 4 Min Read
4 Min Read

– राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाची प्रभावशाली अमलबजावणी!
– बुलढाणेकरांना झटका बसलेल्या कॉपीमुक्त परीक्षांचा पॅटर्न धुळे जिल्हा परिषदअंतर्गत करून दाखविला यशस्वी!
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला गौरव!

मुंबई/साखरखेर्डा (अशोक इंगळे) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या १०० दिवस कृती आराखड्याची धुळे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र विशाल नरवाडे (आयएएस) यांनी या आराखड्यांतर्गत राबविलेल्या विविध नावीण्यपूर्ण उपक्रमांबद्दल आज (दि.२८) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. इतकेच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत असताना नरवाडे यांनी कॉपीमुक्त परीक्षा पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याचा बुलढाणेकरांना जोरदार झटका बसला होता. त्यानंतर निवडणुकांचे कारण सांगून काहींनी त्यांची जिल्ह्याबाहेर बदली केली होती. परंतु, हा कॉपीमुक्त परीक्षांचा पॅटर्नदेखील त्यांनी तिकडे धुळे जिल्ह्यात यशस्वी करून दाखविला आहे. त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांचे अभिनंदन करताना ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे विशेष प्रतिनिधी अशोक इंगळे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत आज पार पडली. यावेळी राज्यातील १५ विविध विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदांमध्ये या आराखड्यातंर्गत सुरु असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद गटात सादरीकरणाची संधी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मिळाली. श्री. नरवाडे यांनी केलेल्या कामकाजाचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सादरीकरणात राज्य शासनाने ठरवून दिलेल्या सात कलमी कार्यक्रमाबरोबरच विविध नावीण्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण श्री. नरवाडे यांनी केले. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ तयार करण्यात धुळे जिल्हा परिषद राज्यात चौथ्या तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे ग्रामविकास विभागाच्या सात सेवा ऑनलाईन प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सुकर जीवनमान अंतर्गत सेवांची पोहोच सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रामीण भागात राहणीमान सुलभ करण्यासाठी ९ उपक्रम राबविण्यात येत आहेत. कार्यालयीन स्वच्छता उपक्रमातंर्गत स्वच्छतेची पंचसुत्री तयार करण्यात येऊन जुन्या निरूपयोगी वस्तुंची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तक्रार निवारण उपक्रमातंर्गत आपले सरकार पोर्टलवरील ३४९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. अभ्यागत भेटीचे नियोजन, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर कार्यालयीन सोईसुविधा उपक्रमातंर्गत कार्यालयाच्या आवारात स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृह, सुसज्ज प्रतीक्षालय, प्रथमोपचार पेटी, दिव्यांग अभ्यागतांसाठी व्हीलचेअर, कार्यालयाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी उपक्रमातंर्गत आठवड्यातून किमान दोन दिवस क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करण्यात येत आहे. प्रशासकीय कामकाजात १ जानेवारीपासून ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. यामुळे कामकाजास गती आली आहे. आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन उपक्रमातंर्गत उद्योगांना पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे. त्यासाठी लागणार्‍या परवानग्या, नोंदणी, कर भरण्याची सुलभता पध्दत सोपी करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी व कृत्रिम बुध्दिमत्ता व तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात आला आहे.
याशिवाय नावीण्यपूर्ण उपक्रमात घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याने काम पूर्णत्वास गती आली आहे. शिवाय, कॉपी मुक्त अभियानाचा धुळे पॅटर्न राज्यभरात नावारुपास येत असून, या उपक्रमाचे शिक्षणमंत्री, मुख्य सचिव तसेच शिक्षण आयुक्त यांनीही कौतुक केले आहे. या विविध उपक्रमांसोबतच पुढील उर्वरित दिवसांचे उत्कृष्ट नियोजन आदिंचे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण श्री. नरवाडे यांनी आज सादर केले. याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकार्‍यांनीही त्यांचे कौतुक केले.
—-

Share This Article
Exit mobile version