जिल्ह्यातील गहू वितरण सुरूळीत : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

admin 4 Min Read
4 Min Read

– नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गतचा (रेशन) गहू पुरवठा सुरूळीत असून, कुठलेही गोदाम बंद केलेले नाही, अथवा गहू पुरवठा बंद केलेला नाही. या संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. रेशन दुकानांतून गव्हाचा पुरवठा सुरूळीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केसगळती संदर्भातील आयसीएमआर अथवा कुठलाही अहवाल अद्याप संबंधितांकडून प्राप्त झालेला नसून, त्यामुळे केसगळतीमागे गहू हेच कारण असावे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. जिल्हाभरात रेशनचा गहू पुरवठा होत असून, त्याबाबत अद्याप नागरिकांच्या तक्रारी नाहीत. तसेच, ज्या नागरिकांना केसगळतीचा सामना करावा लागला होता, त्यांना केस परत आले आहेत, असेही जिल्हाधिकारी यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

पंजाबमधून बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या रेशनच्या गव्हामुळेच केसगळतीचा प्रकार झाल्याचा दावा पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी करून, खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर शिवसेना नेत्या जयश्री शेळके यांनीदेखील हा गहू प्रशासनाने जप्त करून गोदामांना सील करावे, अशी मागणी केली होती.

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्या दाव्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, डॉ. बावस्कर यांचा या संदर्भातील कोणताही अहवाल आम्हाला, अथवा राज्य किंवा केंद्र सरकारला प्राप्त झालेला नाही. तसेच, ते म्हणतात त्याप्रमाणे संबंधित ठिकाणाहून तो गहूही आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात गहू वितरण थांबविण्यात आलेले नाही. जिल्ह्यात चोहीकडे गहू वितरण व्यवस्थित सुरू असून, नागरिकांची कुठेही काहीही तक्रार किंवा समस्या नाही. ज्या भागात केसगळतीचा प्रकार घडला होता, तेथील नागरिकांना केस परत आले आहेत. शिवाय, या केसगळतीसंदर्भात आयसीएमआर किंवा इतर संस्थांचा अहवालही अद्याप आलेला नाही. त्यामुळे केसगळतीचे नेमके कारण अद्याप अधिकृतरित्या पुढे आलेले नाही. परिणामी, गहू वितरण थांबविण्याचा काही प्रश्नच येत नाही, असेही जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू वितरण सुरूळीत असून, रेशन दुकानांत गहू वितरण थांबविण्यात आल्याची माहिती निव्वळ अफवा असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. नागरिकांना रेशनचा गहू नियमितपणे पुरवला जात आहे. नागरिकांनी गव्हासंदर्भातील कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. अफवा पसरविणार्‍यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला.


पद्मश्री डॉ. बावस्कर यांनी सरकारला अहवाल न देता सनसनाटी निर्माण करून काय साध्य केले?; जनमाणसाचा प्रश्न

आता प्रश्न असा निर्माण होत आहे, की पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी पंजाबमधून आलेल्या गव्हामुळे केसगळती झाली, असा जो काही अजब दावा केला आहे, तो कोणत्या आधारावर केला? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेतून उपस्थित होत असून, त्यांच्या संसोधनात काही तथ्य असेल तर त्यांनी आपला अहवाल जिल्हाधिकारी बुलढाणा, राज्य सरकार अथवा केंद्र सरकारला का दिला नाही?, असाही प्रश्न निर्माण होत आहे. डॉ. बावस्कर यांच्या दाव्यामुळे जिल्ह्यात उगाच घबराट पसरली असून, त्याचा गोरगरिबांना नाहकचा फटका बसत आहे. सरकारला अहवाल न देता डॉ. बावस्कर यांनी प्रसारमाध्यमांपुढे जाऊन निव्वळ सनसनाटी निर्माण करून काय साध्य केले? असाही प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. जिल्ह्यातील गहू निर्धोक असून, तो रेशनच्या माध्यमातून सुरूळीतपणे वितरीत होत आहे. तसेच, नागरिकही हा गहू सेवन करत असून, इतरत्र तरी कुठे काही केसगळतीचा प्रकार उघड झाला नाही. त्यामुळे डॉ. बावस्कर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Share This Article
Exit mobile version