– प्राथमिक चौकशीत एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याचे धमकीचे धक्कादायक कारण उघड
– दोन्हीही आरोपींत आतेभाऊ-मामेभावाचे नाते; एका तरूणीच्या मृत्यूवरून दोघांत होते भांडण!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेलप्रकरणी अकोला एटीएस, मुंबई गुन्हे शाखा व देऊळगावराजा पोलिसांनी देऊळगावमही येथून दोघांना उचलले होते. या दोघांची मुंबईत कसून चौकशी सुरू असून, हा धक्कादायक प्रकार आरोपी अभय शिंगणे (वय २५) याने दुसरा आरोपी मंगेश वायाळ याला अडकविण्यासाठी केला असल्याचे तपासात पुढे आले असून, त्यामागे एका तरूणीच्या मृत्यूचे कारण असल्याचेही दिसून आले. अभयचे प्रेम असलेल्या तरूणीच्या मृत्यूला अभयच जबाबदार असल्याचे ठरवून मंगेश वायाळ हा त्याला मारहाण करत होता, त्यामुळेच अभयने खोडसाळपणा करत हा ई-मेल मंगेशच्या ई-मेल आयडीवरून पाठविला असल्याचे पुढे आले आहे. दोन्हीही आरोपींमध्ये आतेभाऊ-मामेभाऊ असे नाते आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी सखोल चौकशी करून या मागचा खरा मास्टरमाइंड शोधावा, अशी मागणी माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी केली आहे.
मंगेश वायाळच्या आयडीवरून सेंड झालेला हा पहिलाच ई-मेल असून, मोबाइलच्या दुकानातूनच हा मेल पाठविला गेला; आपण तो मेल पाठविला नसल्याचे मंगेशने पोलिस व कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानुसार, अभय शिंगणे याची कसून चौकशी करण्यात आली असता, धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अभय शिंगणेचे प्रेम असलेल्या तरूणीचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूला अभयच जबाबदार असल्याचे म्हणत मंगेश वायाळ हा त्याला शिवीगाळ आणि मारहाण करत होता. त्यामुळे मंगेशला धडा शिकवण्यासाठी अभयने हा प्रकार केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. दोन्हीही आरोपींमध्ये आतेभाऊ-मामेभाऊ असे नाते आहे. मंगेश वायाळ अल्पशिक्षित असून, अभयचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. अभय शिंगणेच्या दुकानात मंगेश वायाळ याने मोबाइल चार्जिंगला लावला होता. तेव्हा अभयने त्याच्या मोबाईलमधून धमकीचे हे ई-मेल पाठवले होते. या ई-मेलमागे मोठे गुन्हेगारी कृत्य नसल्याचे उघड झाले असले तरी पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगत चौकशी सुरू ठेवली आहे. केवळ मामेभावाला धडा शिकविण्यासाठी हा खोडसाळपणातून हे ई-मेल पाठविल्याचे गेल्याचे तूर्त तरी प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे.

