– रात्री उशिरापर्यंत ‘एलसीबी’च्या पथकाची कारवाई; १५ क्विंटल ७२ किलोची अफूची झाडे जप्त
– राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; अंढेरा पोलिसांना सुगावाही लागला नाही!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – चिखली तालुक्यातील अंढेरा गाव शिवारातील संताेष सानप नावाच्या शेतकर्याच्या शेतात अफूच्या शेतीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने काल रात्री दहा वाजेच्या सुमारास पर्दाफास केला. रात्री १० वाजेनंतर ही कारवाई सुरू झाली, ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एलसीबी पोलिसांनी कुणालाही सुगावा लागू न देता, ही कारवाई केली. शेतात सुमारे १५ क्विंटल ७२ किलोची अंदाजे किंमत 12 कोटी 60 लाख रूपयांची अफूची झाडे सापडली आहेत. या कारवाईबाबत कमालीची गाेपनीयता पाळण्यात आली असली, तरी एक पाऊल पुढे असलेल्या ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या हाती या कारवाईची माहिती रात्रीच लागली होती, व तसे वृत्तही तातडीने प्रसारित करण्यात आले हाेते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत ही कारवाई केली. पोलिसांनी शेतकरी संतोष सानप याला अटक केली आहे.
चिखली तालुक्यातील अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतच अफूची शेतीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री पर्दाफास केल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूची शेती होत असताना, स्थानिक पोलिस काय करत होते, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल रात्रीच्या कारवाईत एलसीबी पथकाने १५ क्विंटल ७२ किलो अफूची झाडे जप्त केली असून, त्यांची बाजारभावानुसार किंमत १२ कोटी ६० लाख २८ रूपये इतकी आहे. याप्रकरणी शेतकरी संतोष मधुकर सानप (वय ४९) रा. अंढेरा याला पोलिसांनी अटक केली असून, आज त्याला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. त्याच्याविरोधात अंढेरा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ क व १८ क प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजपर्यंतच्या राज्यातील कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी बी महामुनी यांच्या नेतृत्वात व देऊळगावराजाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक अशोक लांडे, एपीआय आशीष रोही, रूपेश शक्करगे, पोलिस उपनिरीक्षक सचिन कानडे, प्रताप बाजड आदींनी ही कारवाई यशस्वी केली. स्थानिक अंढेरा पोलिसांना कारवाईचा सुगावा न लागू देता एलसीबीने ही कारवाई केल्याची चर्चा आहे. रात्री उशिरा ठाणेदार विकास पाटील यांच्याशी ब्रेकिंग महाराष्ट्रने संपर्क केला असता, ते मात्र या कारवाईत सहभागी झाल्याचे दिसून आले होते.

