– कॉपीमुक्त परीक्षेचा जालन्यात बोजवरा; कॉप्या पुरविण्यासाठी उडाली झुंबड!
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – इयत्ता दहावीच्या आजपासून सुरू झालेल्या परीक्षेला पहिल्याच दिवशी गालबोट लागले. मराठी विषयाचा पहिला पेपर सुरू होताच, तो अवघ्या १५ मिनिटांत फुटला. या पेपरचे झेरॉक्स काढून वाटण्यात आल्या व प्रश्नांच्या उत्तरे देण्यासाठी एकच झुंबड उडाली. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, झेरॉक्सवाल्यांनी उत्तरपत्रिकेची एक झेरॉक्स तब्बल २० रूपयांत विकून बक्कळ कमाई केली.
कॉपी पुरविण्यासाठी तरूणांची हुल्लडबाजी!
जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षा केंद्राबाहेर बाहेर तरूणांची हुल्लडबाजी व्हिडिओत कैद झाली आहे. तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरच हा प्रकार सुरू होता. त्यामुळे आतमध्ये परीक्षा देणार्या परीक्षार्थींना बाहेरील गोंधळाचा त्रास सहन करावा लागला.
या संदर्भात विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव डॉक्टर वैशाली जामदार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर शिक्षण मंडळाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. या प्रकरणाचे कोणी दोषी असेल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचेही जामदार यांच्या वतीने सांगण्यात आला आहे.

