– मुंबईत नेण्यात येऊन कसून चौकशी; शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडविण्याची ई-मेलद्वारे दिली होती धमकी
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडविण्याची धमकी देणारे ई-मेल मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात प्राप्त झाले होते. या प्रकरणी भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर, मुंबई गुन्हे शाखा आणि बुलढाणा पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. मंगेश अच्युतराव वायाळ (वय ३५) आणि अभय गजानन शिंगणे (वय २२) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरूणांची नावे असून, हे दोघेही देऊळगाव मही, ता. देऊळगावराजा, जि.बुलढाणा येथील रहिवासी आहेत. त्यांना चौकशीसाठी मुंबईत नेण्यात आले असल्याचे पाेलिससूत्राने सांगितले आहे. अभय शिंगणे हा टेक्निशियन आहे तर मंगेश हा चालक आहे. दोघांनी मिळूनच धमक्या दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपींना ताब्यात घेतले आणि आता त्यांची चाैकशी केली जात आहे.

