– पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकार्यांची मुंबईत महत्वपूर्ण बैठक, सुधारित प्रस्ताव मागितला!
– भगवानराव मुंढे यांच्या प्रयत्नातून आ. मनोज कायंदे यांनी घेतला पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार!
– खडकपूर्णाच्या पाण्यातून तब्बल ५८७ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणामुळे उपलब्ध होणार्या २.९३ दलघमी पाण्याद्वारे देऊळगावराजा तालुक्यातील धोत्रा नंदई, अंढेरा व इतर गावांचा शेतीसाठी लागणार्या सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी पुढाकार घेतला असून, याप्रश्नी त्यांनी काल मुंबईत मंत्रालयामध्ये राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंदआबा पाटील व विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन सविस्तर मांडणी केली. ही बैठक सकारात्मक झाल्याने या भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आ. कायंदे यांनी दिली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुंडे यांनी २००८ सालापासून देऊळगावराजा तालुक्यातील धोत्रा नंदाई, अंढेरा व इतर गावे यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, अशी मागणी केली होती. त्या मागणीला आता मूर्तरूप येण्याची दाट आशा निर्माण झालेली आहे.
या बैठकीत खडकपूर्णा प्रकल्प बाधित ११ गावांच्या मॉडेल नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात. खडकपूर्णा प्रकल्पातून अंढेरा व त्या परिसरातील गावांना कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. खडकपूर्णा जलाशयाचा समावेश नदीजोड प्रकल्पात करण्यात यावा या ठळक मागण्यांसह विविध विषयांवर पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. चर्चेअंती पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांच्या अधिकार्यांना तत्काळ सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. सदर बैठकीस आमदार मनोज कायंदे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुंढे व प्रकाश गिते आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

